महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापुरात लवकरच साकारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर - पालकमंत्री गुरुवार, ०६ जून, २०१९
कोल्हापूर : अवकाश तंत्रज्ञान ही देशाची वाढती गरज असून यासाठी विद्यार्थीदशेपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे, असे सांगून कोल्हापुरात लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अवकाश संशोधन,रॉकेट्स, सॅटेलाईट, ड्रोन या क्षेत्राबद्दल आवड असणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी एसडीएनएक्स ही संस्था काम करते. या संस्थेने महाराष्ट्रातील वाटचालीसाठी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय,जरग नगर,कोल्हापूर यांच्यासोबत सहकार्य करार केले असून, एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब हे महाराष्ट्रातील पहिले अवकाश विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते निर्माण चौक येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ताशी 1800 किमी वेग असणारे रॉकेट, ड्रोन व विमान यांचेही प्रक्षेपण करण्यात आले.


यावेळी इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राचे माजी संचालक पद्मश्री शिवराम धोजे, अंजली चंद्रकांत पाटील, कोल्हापूर पेालीस क्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, इस्त्रोचे माजी प्रकल्प संचालक टी.के.सुंदरमूर्ती, एसडीएनएक्सचे संस्थापक संजय राठी, डीआरडीओचे माजी संशोधक वराप्रसाद मुरली, नासा हनीवेल्सचे स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, या क्षेत्रातील संशोधक लूक नाथान हायस, गोविंद यादव, मिलाप मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.


कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय स्टुडंट रॉकेट लाँचिंगची उभारणी लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष रॉकेट लाँच होईल यादृष्टीने आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विज्ञान तंज्ञत्रान क्षेत्रात देशाची झपाट्याने प्रगती होत असून यामध्ये अनेक तरूण चमकत आहेत. भारत हा केवळ विविध वस्तूंचे उत्पादन करणारा देश न राहता तो संशोधन करणारा देशही बनला पाहिजे यासाठी लहानपणापासूनच संशोधक व चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. यादृष्टीने एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 36 तासांचा अभ्यासक्रम असून रोबोटिक आर, सॅटेलाईट, रॉकेट आदी विविध अवकाशीय उपकरणे घडामोडींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येईल, प्रात्यक्षिके दाखविली जातील. याचा कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्य व सुविधा देण्यात येतील. तसेच फिरत्या प्रयोगशाळांसारखे उपक्रमही राबविण्यात येतील असे सांगितले.


पद्मश्री शिवराम धोजे यांनी अंतराळ संशोधनात भारताने केलेली कामगिरी अव्दितीय असून भारतामध्ये प्रचंड बौध्दिक,तांत्रिक क्षमता आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करून त्याचा देशाच्या विकासासाठी उपयोग होणे महत्वाचे आहे, असे सांगितले.


यावेळी कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी समाजातील वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ करण्यासाठी एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. भालचंद्र चिकोडे येथील लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात 6 वी ते 8 वी व 9 वी ते 12 वी अशा दोन वयोगटातील प्रत्येकी 100 मुलांसाठी 10 ते 15 जून या कालावधीमध्ये प्रवेश अर्ज उपलब्ध असतील. या कार्यशाळेमध्ये रोबोटिक आर्म, ड्रोन,रॉकेट,सॅटेलाईट असे वेगवेगळे 12 प्रकल्प शिकविले जाणार आहेत. या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क असेल. आर्थिकदृष्टया दुर्बलांना काही प्रमाणात सवलत असेल. एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब कोल्हापुरातील नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नवी दृष्टी,नवी संधी देणारी ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी या क्षेत्रातील मान्यवर संशोधकांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result