महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री मुंडे गुरुवार, २६ ऑक्टोंबर, २०१७
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

बीड :
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायतींना भरपूर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अठराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार विनायक मेटे होते. आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगीता ठोंबरे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, कारखान्याच्या संचालक यशश्री मुंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प.सभापती युध्दजित पंडित, संतोष हंगे, फुलचंद कराड, रमेश आडसकर, रमेश पोकळे आदींची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत असून येणाऱ्या काळात गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत. नव्याने निवडून आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी या निधीचा चांगला उपयोग करुन घेतला पाहिजे व आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल आला असून या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नेहमी प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. या कारखान्याने मागील काळात विक्रमी गाळप करुन उच्चांक गाठला होता. तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या उसाला जादा भाव दिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावर्षी गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असून पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे कारखाना पुढील वर्षी चालू राहण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातून आठ राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. परळी मतदारसंघात 100 कि.मी.चे रस्ते मंजूर झाले असून येणाऱ्या काळात रस्त्याचे एकही काम शिल्लक राहणार नाही. तसेच विविध विकास कामाच्या माध्यमातून परळी मतदारसंघासह जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी योगदान देणार आहे, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

श्री.मेटे म्हणाले की, जिल्ह्यात सहकार चळवळ निर्माण करण्याचे काम स्व.गोपिनाथराव मुंडे यांनी केले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून पांगरी येथील साखर कारखान्याची उभारणी पूर्ण झाली आहे. या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे.

यावेळी श्रीमती ठोंबरे, श्री.पवार, श्री.देशमुख, श्री.पटेल, श्री.कराड, श्री. आंधळे, गणेश हके, रमेश पोकळे, रमेश आडसकर यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी टाकून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अठराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result