महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक शांतता व निर्भयपणे पार पाडावी - विभागीय आयुक्त पीयुष सिंग गुरुवार, १४ मार्च, २०१९


लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

अकोला :
जिल्हा प्रशासनाने अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज रहावे व येणारी निवडणूक शांतता व निर्भयपणे पार पाडावी असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंग यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनात लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जीतेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लढाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

घरोघरी जावून बी.एल.ओ. मार्फत दुबार मतदारांची पडताळणी करुन अद्यावत यादी पूर्ण करावी असे सांगून विभागीय आयुक्त म्हणाले की, या निवडणूकीत व्हीव्हीपॅडचा पहिल्यांदाच वापर होत असल्यामुळे मतदान केंद्रावर प्रशिक्षीत अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करावी व त्यांना योगय प्रशिक्षण द्यावे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नवीन मतदार नोंदणीची कार्यवाही पूर्ण करुन अंतिम तारखेच्या दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावी अशा सुचना पीयुष सिंग यांनी दिल्यात.

दिव्यांग मतदारांसाठी विनामुल्य वाहतूक सेवा व व्हीलचेअरची व्यवस्था करावी यासाठी स्वतंत्र सेवकाची नियुक्ती करावी. आवश्यकता वाटल्यास महानगरपालिका, जिल्हापरिषद व नगरपालिका यांनी व्हीलचेअर खरेदी कराव्यात. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदार, वृध्द व गर्भवती महिलांसाठी मतदान केंद्रावर वेगळी रांग असावी असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त पीयुष सिंग यांनी मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा, संवेदनशील मतदान केंद्र, दिव्यांग मतदार, ईव्हीएम-व्हीव्ही पॅडची ‍स्थिती, निवडणूक असेलेली वाहतूक व्यवस्था, माध्यम प्रमाणीकरण व संनियत्रण समिती, निवडणूक खर्च समिती, सुगम सुविधा, समाधान या आयटी ॲप, सिव्हीजल समिती, कायदा व सुव्यवस्था आदी निवडणूक विषयक विविध बाबींचा आढावा घेतला.

या बैठकीला सहाही विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध समित्यांचे नोडल अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result