महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउद्योजक घडतील- डॉ. रणजित पाटील रविवार, ०३ मार्च, २०१९


पीकेव्हीच्या ठाकरे सभागृहात तरुणांनी मांडल्या नाविण्यपूर्ण कल्पना
विविध नाविण्यपूर्ण प्रयोगांचे स्टॉल ठरले आकर्षणाचे केंद्र

अकोला
: समाजाच्या हितासाठी तरुणांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याबरोबरच त्यांच्या प्रयोगांना चालना व प्रोत्साहन मिळण्यासाठी अकोला स्टार्टअप फेस्ट तरुणांसाठी एक मोठी संधी ठरली आहे. या माध्यमातून भविष्यात अनेक चांगले नवउद्योजक निश्चितपणे घडतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाच्या अनुषंगाने अकोला स्टार्टअप फेस्टअंतर्गत एक नामवंत व्यवसाय निर्मितीची स्पर्धा अर्थात बिझनेस प्लॅन स्पर्धेचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाव्दारे आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालयातील के. आर. ठाकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक द.ल. ठाकरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

विविध समस्यांचे निराकरण करण्याकरीता उपयुक्त असलेल्या त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उद्योगात रुपांतर होऊ शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या कोणत्याही व्यक्ती/गट/ आस्थापना /संस्था यांना सदर स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला सुमारे 60 स्टार्टअपची नोंदणी यावेळी झाली. अनेकांनी कार्यक्रमस्थळाच्या परिसरात आपल्या नाविण्यपूर्ण प्रयोगाचे स्टॉल लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वत: पालकमंत्री यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन नाविण्यपूर्ण उपक्रम सादर केल्याबददल त्यांचे कौतुक केले.पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरीता बनविलेले यंत्र, कचऱ्यावर विविध प्रक्रिया करणारे यंत्र, चोरांपासून आपली दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलवरुन नियंत्रण करणारी यंत्रणा, हळदीवर प्रक्रिया करणारे यंत्र, पायऱ्यांवर सहजपणे कॅरेटची वाहतूक करणारे उपकरण, नाविण्यपूर्ण डवरणी यंत्र अंधांसाठी समोर येणाऱ्या अडथळ्याची सूचना देणारी यंत्रे बसविलेली काठी यासारख्या नाविण्यपूर्ण संकल्पना सर्वांचे आकर्षण ठरले.

अनेकांच्या मनात नानाविध चांगल्या कल्पना येतात, या कल्पना प्रत्यक्ष साकार होण्यासाठी आणि त्याचा उपयोग समाजातील नागरिकांना होण्याकरीता शासनाने डिस्ट्रीक बिझनेस प्लॅन स्पर्धा राबविण्याचे ठरविले, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, ही स्पर्धा जिल्ह्याबरोबरच विभाग तसेच राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय केले जाणार आहे. आपल्या जिल्ह्यातूनही या स्पर्धेच्या माध्यमातून नवउद्योजक घडावेत. स्वयंरोजगाराकरीता कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात, त्याचा लाभही तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. पापळकर म्हणाले की, अकोला स्टार्टअप फेस्ट तरुणांसाठी एक चांगला कार्यक्रम आहे. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष साकार करुन त्याचा समाजासाठी फायदा करुन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही नाविण्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्या तरुणांना प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल.

श्री.प्रसाद म्हणाले की, आजच्या युगात नाविण्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्यांना प्रचंड संधी आहे. अकोला स्टार्टअप फेस्टसारख्या उपक्रमातून नवीन कल्पना पुढे येण्याबरोबरच त्याचे उदयोगात रुपांतर होण्यास मदत होणार आहे. यातून रोजगाराच्या उपलब्धतेबरोबरच देशाची प्रगतीही होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही अकोला स्टार्टअप फेस्टचे कौतुक करुन तरुणांनी आपल्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचे आवाहन केले.

यावेळी सुशिक्षित बरोजगार उमेदवारांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. विविध सात कंपनीच्या प्रतिनिधीव्दारे सुमारे 350 च्यावर पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या उपक्रमासही चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात घरांचे अतिक्रमण नियामानुकूल करण्यात आलेल्या बेघर कुटुंब प्रमुखांना प्रातिनिधीक स्वरुपात नमुना-8 प्रमाणपत्राचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result