महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकोला लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदान गुरुवार, १८ एप्रिल, २०१९


वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रांनी लक्ष वेधले

अकोला :
अकोला लोकसभा मतदारसंघातसाठी आज २ हजार ८५ मतदान केंद्रांवरून मतदारांनी उत्साहात मतदान केले. महिलांतर्फे संचालित सखी, सोयी-सुविधांयुक्त आदर्श, तर दिव्यांगांतर्फे दिव्यांग मतदान केंद्र अशा वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात आज मतदान पार पडले.

आज सकाळी ७ वाजल्यापासून लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ८.०८ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २१.०३ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.४२ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.३९ टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४.७३ टक्के मतदान झाले. या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या ‍ठिकाणाहून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जीतेंद्र पापळकर यांनी निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेऊन होते.


मतदारांचा उत्साह वाढावा यासाठी जिल्हा यंत्रणेने विविध उपक्रम राबविले. महिलांद्वारे संचालित पाच सखी मतदान केंद्र, सर्वसोयींनी युक्त असे पाच आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. दिव्यांगांच्या सोयीसाठी ऑटो युनियनने त्यांना मोफत सेवा पुरविली. तसेच मतदान केंद्रावर व्हिलचेअरही पुरविण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर मेडीकल कीटही ठेवण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २१२ मतदार केंद्राचे वेबकास्टींग करण्यात आले. या माध्यमातून जिल्हाभरातील मतदान केंद्रांवरील परिस्थितीवर निगराणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी जीतेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले यांनी सीताबाई कला महाविद्यालयात मतदान केले. ग्रामीण आणि शहरी भागात मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवा मतदारांमध्ये उत्साह होता. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result