महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सुशिक्षित मुली भारताला विश्वगुरूचा सन्मान प्राप्त करून देतील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
  • जिल्ह्यातील पहिल्या मुलींच्या डिजिटल शाळेचे मुलींनीच कुदळ मारून केले उद्घाटन
  • बल्लारपूर शहरातील तीन शाळांचे भूमिपूजन व बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण

चंद्रपूर :
कुटुंबाची ओळख पैशाने होत नसून ज्ञानाने होते. जेव्हा देशातील संपूर्ण मुली सुशिक्षित होतील. तेव्हाच जगात भारत देशाचा नावलौकिक विश्वगुरू म्हणून होईल. त्याकरिता विशेष मुलींकरिता जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा उभारण्याचा संकल्प केला, असे मत राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी बल्लारपूर येथे आयोजित डिजिटल शाळेच्या बांधकाम भुमिपुजन सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेंतर्गत बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्डातील सुभाषचंद्र बोस शाळा, कन्नमवार तेलुगु शाळा, राणी लक्ष्मीबाई शाळेच्या तीन कोटी ५२ लाख रुपये किमतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्याच शाळेतील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या लोकार्पण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र शासनामार्फत सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील निराधार, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत महिला सोबतच ज्येष्ठ नागरिकांचे मानधन वाढवण्यात आले असून ६०० रुपये वाढवून १००० रुपये तर २ मुले असणाऱ्या निराधार महिलांना १२०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच ६ कोटी ९७ लाख रुपये खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या विशेष मुलींकरिता असलेल्या डिजिटल शाळेचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result