महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ होण्याची गरज - पालक सचिव एस एस संधू रविवार, ०५ एप्रिल, २०१५
परभणी : जलसंधारणाच्या विविध कामांमुळे जलसाठे वाढण्यास मदत होत असल्याने ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ होण्याची गरज असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव व परभणी जिल्ह्याचे पालक सचिव एस एस संधू यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी एस पी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अपर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस के दिवेकर तसेच संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव व परभणीचे पालकसचिव एस एस संधू म्हणाले, यावर्षी पावसाळ्यात उपलब्ध पाणी साठविणे गरजेचे आहे. यासाठी राबविण्यात येणा-या जलयुक्त शिवार अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी. यासाठी मशालफेरी, वृक्षदिंडीसारखे उपक्रम घेऊन या अभियानाबाबत गावागावात वातावरणनिर्मिती करून ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग वाढविण्यार भर देण्यात यावा. यासाठी लोककला व लोककलाकारांना सहभागी करून घ्यावे. जमिनीची धूप होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्या. नरेगाअंतर्गत कामे करण्यासाठी मजुर उपलब्ध आहेत. ज्या कामांची उपयोगीता अधिक आहे अशी कामे प्राधान्याने घेण्यात यावीत असेही श्री संधू यांनी सांगितले.

ढाळीच्या बंधा-यांची कामे सर्व तालुक्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. जिल्ह्यात शेतक-यांकडून शेततळ्यांची मागणी होत आहे. डीप सीसीटीसाठी धनगरमोहा गाव पथदर्शी म्हणून निवडण्यात आले आहे. लोकसहभागातून गाळ काढल्यानंतर खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 एस एस संधू यांनी झरी येथे ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामाला,वरूड येथे सिमेंटनाला बांधमधील गाळ काढण्याच्या कामाला, वडाळी येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे कामाला भेट देऊन पाहणी केली. झरी येथे ओढ्याच्या खोलीकरणाचे काम सुरू असून याकामी लोकसहभाग वाढवावा असे आवाहनही श्री संधू यांनी केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. स्थानिक भागात उपलब्ध उद्योगांना उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागात थोडेफार कौशल्य असणार्‍यांना त्या संबधीत व्यवसायाचे प्रशिक्षण द्यावे असे निर्देश एस एस संधू यांनी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result