महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रोहयो अंतर्गत सार्वजनिक उपयोगाची कामे सुरू करावीत - रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल शनिवार, ११ मे, २०१९


नंदुरबार :
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक उपयोगाची कामे सुरू करावीत आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील दुष्काळी भागाच्या पाहणी प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.

श्री.रावल म्हणाले, रोहयो अंतर्गत आलेल्या सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार रस्ते, गाळ काढणे आणि वृक्ष लागवडीची कामे घेण्यात यावी. ग्रामस्थांना केलेल्या कामांची मजुरी सात दिवसाच्या आत देण्यात यावी. नागरिकांना गावातच काम मिळून कोणाचेही स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, तापी-बुराई योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन नागरिकांना सप्टेंबरपर्यंत याचा लाभ मिळू शकेल. पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून हाटमोहिदा येथे पंप बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. हाटमोहिदा-निमबेल, निमबेल-आसाणे आणि आसाणे-शनिमांडळ पाईपलाईनचे कामदेखील वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील भागाला पाणी उपलब्ध करून देता येईल. मालपूर प्रकल्पात यामुळे पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे परिसरातील गावांना त्याचा लाभ मिळू शकेल.

खोक्राळे, वैदाणे, खर्दे खुर्द, सैताणे, बलवंड, रजाळे, ढंढाणे या भागात सातत्याने पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची तीव्रता वारंवार जाणवते. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी कायमची सुविधा करण्यावर भर देण्यात येत असून त्यादृष्टीने ग्रामस्थांनी योग्य प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी देण्यात येईल. खोकराळेसाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळविण्यासाठी न्याहली ग्रामस्थांशी संवाद साधण्यात येईल. वैंदाणे येथे विंधन विहीरीच्या कामास मंजुरी देण्यात येईल. तसेच या गावाच्या चारा प्रश्नाविषयी प्रशासनाला आवश्यक सुचना करण्यात येतील, असेही श्री.रावल म्हणाले.

ज्या गावात तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण होण्यास उशिर होणार असेल त्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

तत्पूर्वी श्री.रावल यांनी हाटमोहिदा येथे तापी-बुराई प्रकल्पाची पाहणी केली. पहिल्या टप्प्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तेथील ग्रामस्थांशीदेखील त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result