महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री पंकजा मुंडे यांची चारा छावण्यांना भेट, तळेगाव येथे भर उन्हात केले श्रमदान शुक्रवार, १० मे, २०१९


राज्य शासन शेतकऱ्यांच्या सुख - दु:खाशी बांधलेले - पालकमंत्री पंकजा मुंडे

बीड :
राज्य शासन शेतकऱ्यांच्या सुख, दु:खाशी बांधलेले असून दुष्काळामध्ये शेतकरी व जनावर मालकांच्या पाठिशी शासन या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारा छावण्यांना आज त्यांनी भेट दिली, यावेळी मंत्री श्रीमती मुंडे बोलत होत्या. पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी, शिरूर तालुक्यातील आव्हाळवाडी, खोकरमोहा, रायमोहा तसेच बीड तालुक्यातील तळेगाव, आहेरवडगाव, मांजरसुंबा येथील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी, जनावरांचे मालक व चारा छावणी चालक यांच्याशी चर्चा केली त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, शेतकऱ्यांची जनावरे जगवणे हे प्राधान्य असून त्यांना चारा व पाणी देण्यासाठी सरकार बांधील आहे. २०१२ मध्ये जिल्ह्यात ८० चारा छावण्या होत्या. पूर्वी चारा छावणी लांब असायची व एका-एका छावणीत दहा-दहा हजार जनावरे असायची पण शासनाने नियमांमध्ये बदल केला यामुळे शेतकऱ्यांच्या गावाजवळ छावणी मिळाल्याने जनावरे लांब नेण्याचा त्रास कमी झाला आहे. एका एका चारा छावणीतील जनावरांची संख्या कमी झाली असून छावण्यांची संख्या ८५० वर गेली आहे.

त्या म्हणाल्या, नागरिकांनी पाणी देण्यासाठी टँकरने पाणी पुरवणे हा तात्पुरता उपाय आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी उपाय करण्यात येतील, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी कानिफनाथ सेवा भावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या चारा छावणीस भेट देऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या वेळी शेतकरी व जनावरांचे मालक यांच्यासोबत पंक्तीमध्ये बसून जेवण केले. बीड तालुक्यातील तळेगाव येथे जलसंधारणासाठी सुरु असलेल्या कामासाठी श्रमदान केले.

पाणीटंचाईत नागरिकांना, शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कालावधीत येत असलेल्या अडचणी समजावून घेण्यासाठी पालकमंत्री श्रीमंती मुंडे जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. उर्वरित दौऱ्यात अंबेजोगाई, परळी, वडवणी, गेवराई आदी तालुक्यातील गावांना भेटी देऊन जनतेच्या अडचणी या दोन दिवसांमध्ये समजून घेणार आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result