महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शासनाचा उत्कृष्ट उपक्रम - शिवाजी कादबाने गुरुवार, ०५ जानेवारी, २०१७
नवी मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी, मराठी भाषा पंधरवाडा हा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट उपक्रम आहे असे मत उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने यांनी व्यक्त केले. भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, मुंबई व कोकण विभाग या कार्यालयातर्फे आयोजित ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास, डॉ.मंजुषा कुलकर्णी, भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य व श्री.अरूण गिते, विभागीय सहायक भाषा संचालक आदी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, भाषा संचालनालयाच्या विविध परिभाषा कोशांचा व प्रकाशनांचा तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशनांचा परिचय व्हावा आणि ही प्रकाशने वाचकांना खरेदी करता यावीत या दृष्टीने ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांची प्रकाशने, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांची प्रकाशने, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांची प्रकाशने, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांची प्रकाशने प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमास मीना मि. गुरुसिद्धनवर, नरेंद्र हवालदार, सदाशिव मदन गिरप, प्र. का. भोईर, आदी भाषा संचालनालयातील कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण भवन येथे “लोकराज्य” स्टॉल

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कोकण भवन येथील ग्रंथ प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला आहे.

लोकराज्य या मासिकामध्ये शासकीय योजना व निर्णय यांची माहिती देण्यात येते. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी लोकराज्य स्टॉल या ग्रंथ प्रदर्शनात लावण्यात आला आहे.

या स्टॉलवर वृक्ष लागवड विशेषांक, आदिवासी विशेषांक, आपले पोलीस विशेषांक, निवडणूक विशेषांक आदी विविध विशेषांक ठेवण्यात आले आहेत. लोकराज्यच्या या स्टॅालला उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने व डॉ.मंजुषा कुलकर्णी, भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेकांनी भेट दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result