महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चारा छावण्यांमधील जनावरांना १८ किलो हिरवा चारा देण्याचे शासनाचे आदेश पारित - पालकमंत्री मंगळवार, ०७ मे, २०१९


शासन बळीराजा व त्याच्या पशुधनासाठी सदैव कटीबद्ध

उस्मानाबाद :
पूर्वीच्या नियमाप्रमाणे चारा छावण्यातील मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो हिरवा चारा देण्याचे शासनाचे आदेश होते मात्र आता शेतकऱ्यांची गरज ओळखून शासनाने चार मे च्या शासन निर्णयानुसार चारा छावणीतील मोठ्या जनावरांना प्रतिदिन १८ किलो हिरवा चारा देण्याचे आदेश नव्याने पारित केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या काळजीपोटी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली होती की,राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यावरील उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी.यासाठी निवडणूक आयोगानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत दुष्काळी परिस्थितीत जनतेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता काही अंशी शिथिल करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुषंगाने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्ह्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

आज पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी सरमकुंडी, हांडोग्री, मलकापूर, खामगाव आणि ढोकी या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत येथील नर्सरी, पशुधन, चारा छावणी, बोअर अधिग्रहण, विहीर अधिग्रहण, टँकरची मागणी आदी प्रश्नांबाबत शेतकऱ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींशीही सविस्तरपणे गांभीर्यपूर्वक चर्चा केली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) श्री. सुरेश मारकड व सामाजिक वनीकरण चे विभागीय वन अधिकारी श्री. बेडके यांनी नरेगा अंतर्गत एकूण ६८८ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू असून सामाजिक वनीकरण व तालुका कृषी अधिकारी अंतर्गत यंत्रणांची एकूण १३९ कामे सुरू असल्याची माहिती पालकमंत्री श्री. खोतकर यांना दिली.याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मजुरांची साप्ताहिक उपस्थिती ७ हजार ३५८ तर यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर मजुरांची उपस्थिती १ हजार ९८३ असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच सिंचन विहिरींची ४४४, शेततळ्यांची २२ आणि घरकुलाची १९५ कामे सुरू असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.


यावेळी पालकमंत्री श्री.खोतकर यांनी या ठिकाणी उपस्थित महिला मजुरांशीही संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या रोजगाराविषयी, भत्याविषयी, अडीअडचणींविषयी आस्थेवाईकपणे विचारणाही केली. चारा छावण्यांना भेट देताना तेथील शेतकऱ्यांशीही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी सविस्तर चर्चा केली.जनावरांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली,त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी जाणून घेतले.काही समस्यांबाबत पालकमंत्री श्री.खोतकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या तात्काळ सोडवण्याविषयीचेही मोबाईलवरून आदेश दिले.यावेळी श्री.खोतकर यांनी शासनाने ४ मे रोजी पारित केलेल्या शासननिर्णयाची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. त्यांनी यावेळी या शासन निर्णयातील पशुधन आहारात झालेली वाढ, दैनंदिन उपस्थितीची नोंद, बारकोड द्वारा पशुधनाची मोजणी इत्यादी बाबींविषयीची माहिती दिली. याचबरोबर पूर्वी मोठ्या जनावरांना १५ किलो हिरवा चारा व उसाचे वाडे देण्यात येत होते, ते आता या नवीन शासन निर्णयाप्रमाणे १८ किलो हिरवा चारा व उसाचे वाडे तर लहान जनावरांनाही पूर्वी साडेसात किलो पशुखाद्य दिले जात होते परंतु नव्या शासन निर्णयानुसार आता ते नऊ किलो दिले जाईल, अशीही माहिती श्री.खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिली.

याशिवाय पालकमंत्री श्री.खोतकर यांनी सरमकुंडी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या चारा छावणी व टँकरच्या मागणीची, हांडोग्री येथील शेतकऱ्यांनी केलेल्या चारा छावण्यांची व राहत शिबिराच्या मागणीची,भूम मधील पाथरूड येथील विहीर अधिग्रहण मागणीची, मलकापूर येथील बोअर अधिग्रहण मागणीची,खामगाव मधील चारा छावणीकरिता जनरेटरच्या मागणीची तसेच विद्युत पुरवठाच्या मागणीची,ढोकी येथील टॅंकरच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शक्य तितक्या लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा,असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना दिले.त्याचबरोबर उपस्थित अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले की,त्यांनी चारा छावण्यांची पाहणी करतानाही पशुधन व शेतकऱ्यांना नियमित सोयीसुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश आघाव,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील पसरटे,नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मारकड, विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण)श्री. बेडके तसेच विविध पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result