महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे प्रेरणास्थान - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सोमवार, ०९ एप्रिल, २०१८
राज्यात सामाजिक समता सप्ताहास सुरुवात

ठाणे :
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समता खऱ्या अर्थाने आपल्याला प्रस्थापित करावयाची आहे. त्यामुळे सर्व जाती,धर्म, पंथ यांच्या वर जाऊन विचार करावा लागेल, बाबासाहेबांचे नाव घेणे आणि त्यांच्याविषयी बोलणे याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे असे समाजातील काही घटकांना वाटते मात्र बाबासाहेब सगळ्यांचे होते, असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नेरूळ येथे सांगितले.

येथील डी.वाय.पाटील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या सभागृहात त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. १४ एप्रिलपर्यंत या सप्ताहानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्यायमंत्री म्हणाले की, १९५० मध्ये बाबासाहेबांनी घटना परिषदेत जे भाषण केले ते आपण वाचले पाहिजे, त्यांना जी समता अभिप्रेत होती त्यादृष्टीने आपण बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने समजून घेतले आहे का? गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिल हा दिवस `ज्ञान दिन` म्हणून राज्यात पाळण्याचे घोषित केले आहे. त्यामागे बाबासाहेबांचे ज्ञान आणि विचार लोकांपर्यंत पोहचवून त्याचे अनुकरण झाले पाहिजे असा उद्देश आहे. गेल्या 3 वर्षांत सामाजिक न्यायाच्या बाबतीत आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. बाबासाहेबांचे लंडन येथील वास्तव्याचे घर लिलाव होणार होते त्याबाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात भेटी दिलेल्या अथवा वास्तव्य केलेली ठिकाणे आम्ही विकसीत करीत आहोत. शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित व्हावी म्हणून आम्ही डीबीटी यंत्रणा आणली. त्यात सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील पण त्या दूर करून करून आम्ही एक चांगली व्यवस्था निर्माण करीत आहोत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना देखील आम्ही अर्थसहाय्य करीत आहोत. आपली मुलं आयएसएस, आयपीएस व्हावी यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत, मार्गदर्शन करीत आहोत.

याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टरच्या किल्ल्या देण्यात आल्या तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, तसेच करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ, शाहीर विष्णू शिंदे, व्यसनमुक्ती या विषयवार रघुनाथ देशमुख यांची भाषणे झाली. प्रारंभी मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी प्रास्ताविक केले. तर सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सपकाळे यांनी आभार मानले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

या सप्ताहात महाविद्यालये, शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा, तसेच शासकीय व अनुदानित वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा होतील. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्जवाटप योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल. जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी व सिव्हिल सर्जन यांचे सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच आरोग्य तपासणी कार्यक्रम होणार आहे. समता दूतामार्फत ग्रामस्तरावर पथनाट्य लघुनाटिका इत्यादींचे कार्यक्रम करून सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमा बाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result