महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चारा छावण्यांचे संचालन काटेकोरपणे करा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना गुरुवार, ०९ मे, २०१९


सोलापूर :
जिल्ह्यातील चारा छावण्याचे संचलन काटेकोरपणे करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त प्रताप जाधव, पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, ‘चारा छावणीतील जनावरांचे लसीकरण करा. लहान जनावरांचे निर्जंतुकीकरण करा. पशुपालक समितीची स्थापना करा. टँकर भरून घेण्यासाठीचे स्त्रोत निश्चित करा. टँकरची देयके जीपीएसच्या लॉगबुक तपासूनच द्यावी. त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावी. टँकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कडून खात्री करून घ्यावी. टँकरला अजिबात गळती असू नये.'

नरेगावरील कामावर मजूर येण्यासाठी नियोजन करावे. बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे घ्यावीत. टँकर भरण्यासाठीच्या स्त्रोतांच्या परिसरातील वीज पुरवठ्याचे नियमन करताना उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली जावी, अशाही सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.

यावेळी जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरण, महानगरपालिका, जलसंपदा, महावितरण अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आवश्यक असेल तिथे २४ तासांत टँकर :जिल्हाधिकारी डॉ. भोसले

पाणी टंचाईच्या गावातून मागणी आल्यास चोवीस तासात टँकर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. टँकर मागणी असलेल्या गावांना उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे भेट द्यावी. मागणीत तथ्य असल्यास तत्काळ टँकर द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.


खवासपूर, लोटेवाडीतील चारा छावणीची विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

सांगोला तालुक्यातील खवासपुर, लोटेवाडी व शिवणे येथील चारा छावणीला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी भेट देवून चारा छावणीतील पशुपालकाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , महसूल उपायक्त प्रताप जाधव, सहाय्यक आयुक्त विलास जाधव, प्रांतधिकारी उदयसिंह भोसले, तहसिलदार संजय पाटील उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी बुधवारी सायंकाळी सांगोला तालुक्यातील छावणीतील जनावरांना आवश्यक चारा व पुरेसा पाणी पुरवठा तसेच छावणीत राहणाऱ्या पशुपालकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत माहिती घेतली. चारा छावणीत ठेवण्यात आलेल्या चारा साठा वाटप नोंदवहींची तपासणी केली. चारा छावणीत अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी जनावरांची तपसाणी करावी, तसेच छावणीत दाखल जनावरांची ओळख पटविण्यासाठी टॅगिंग करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result