महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर मंगळवार, २३ ऑक्टोंबर, २०१८
उस्मानाबाद : राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालकमंत्री व मंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यात स्वतः जाऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाहन केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देऊन पालकमंत्री अर्जुन खोतकर जिल्हा दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले तसेच दिवसभराचा दौरा पूर्ण करून त्यांनी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर, विधानसभा सदस्य आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राहुल मोटे या लोकप्रतिनिधींसह आढावा बैठक घेतली.

या बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.खोतकर यांनी जिल्ह्यातील पाणीसाठा आरक्षित करणे, शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून त्यांना शक्य ती जास्तीत जास्त मदत करणे, केंद्रीय पथक जिल्ह्यात येण्यापूर्वी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल व आवश्यक ते अभिलेखे तयार ठेवणे, याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच या बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींचेही मत, सूचना विचारात घेऊन त्याची नोंद स्वतः घेतली.

या पाहणी दौऱ्याचा तसेच बैठकीतील चर्चेचा सविस्तर वस्तुनिष्ठ अहवाल पालकमंत्री श्री.खोतकर यांनी तात्काळ मुख्यमंत्री फडणवीस यांना सादरही केला. अशाप्रकारे संवेदनशीलता बाळगून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची तळमळ मनात ठेवून दुष्काळी परिस्थितीचा अहवाल तातडीने सादर करणारे श्री.खोतकर हे राज्यातील पहिले पालकमंत्री आहेत.

या सर्व कार्यवाहीत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, पारदर्शकतेने निर्णय प्रक्रिया झटपट राबविणारे जिल्हाधिकारी श्री.गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कोलते यांचेही पालकमंत्री खोतकर यांनी अभिनंदन केले आहे.

पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी दुर्दैवाने निर्माण झालेल्या या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. आधी जिल्ह्यातील फक्त एकच तालुक्याचा (लोहारा) ट्रिगर २ मध्ये समावेश झालेला असताना नंतर या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी उमरगा वगळता बाकी सर्वच्या सर्व म्हणजे सहाही तालुक्यांचा (कळंब, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, वाशी, परंडा) ट्रिगर २ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

पालकमंत्री श्री.खोतकर व सहकारी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांनी जनतेला आवाहन केले आहे की, घाबरू नका, धीर धरा, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून प्रत्येकाला मिळेल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result