महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९
सोलापूर : महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनी पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यांनी महाराष्ट्र दिनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री विजय देशमुख बोलत होते. येथील पोलीस आयुक्त मुख्यालय येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. सोलापूर शहर कामगारांचे शहर म्हणुन ओळखले जाते, सोलापूरच्या विकासात कामगारांच्या श्रमांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, संस्कृती, उद्योग आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपली अमीट छाप उमटविली आहे. अनेक मराठी व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राची ओळख जगभर नेली आहे. राज्य आणि देशाच्या विकासात सर्वांनी आपापल्यापरीने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.

सकाळी ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शानदार संचलनाने झाली. संचलनात पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य राखीव पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक आणि गृहरक्षक दलांच्या पथकांचा यामध्ये समावेश होता. पथसंचलनाचे नेतृत्व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता विलास मोरे, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रभाकर नाळे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, पोलीस उपायुक्त बापु बांगर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, शिवाजी जगताप, उत्तम पाटील, तहसिलदार जयवंत पाटील, वैशाली वाघमारे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर प्रशासकीय इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेघा शिर्के - होमकर यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result