महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अडचणींच्या निराकरणासाठी शासन आपल्या दारी उपक्रम - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोमवार, ०४ डिसेंबर, २०१७
कासेगाव, केदारवाडीत शासन आपल्या दारी उपक्रमास प्रतिसाद

सांगली :
सर्वसामान्य माणसाच्या अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि केदारवाडी ता. वाळवा गटात शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गट विकास अधिकारी राहुल रोकडे, तालुका कृषि अधिकारी भगवान माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कोळी, भूमिअभिलेख विभागाचे श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

वाळवा तालुक्यात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या. यामध्ये नळजोडणी, वीजजोडणी, वारस नोंदी, पाणंद रस्ते, घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे, जलस्वराज्य प्रकल्प, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार, उपसा सिंचन योजना आदिंबाबत ग्रामस्थांनी प्रश्न मांडले.

कृषि व अन्य विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना व्हावी, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विविध योजनांचे माहिती फलक प्रदर्शित करावेत, असे निर्देश देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. मात्र, लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्यामध्ये काही त्रुटी असतील, तर त्यांची पूर्तता व्हावी. तसेच, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना अधिकाधिक मिळावा, यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची इस्लामपूर येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वाळवा तालुक्यात कृषि विभागाच्या योजनांतर्गत ट्रॅक्टर व बाबींसाठी आपण सर्वाधिक निधी आणला आहे. याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. मात्र, त्यामध्ये ग्रामस्थांना अडचणी येत असतील, तर ग्रामसेवक व तलाठी यांनी त्यांना मदत करावी. तसेच, आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते आणि घरकुल बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने एक लाख, 36 हजार रुपये अनुदान दिले जाते. याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result