महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासकीय रूग्णालयांतील आरोग्य सुविधा अद्ययावत करणार - गिरीष महाजन शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०१७
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन

सांगली :
खाजगी दवाखान्यातील महागडे आरोग्य उपचार सर्वसामान्य रूग्णांच्या आवाक्याबाहेरील असतात. अशा रूग्णांसाठी शासकीय रुग्णालय हाच आशेचा किरण असतो. त्यामुळे शासकीय रूग्णालयांतील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिली.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय अंतर्गत विविध विभागांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन झाल्याचे घोषीत करून वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन म्हणाले, राज्य शासनाने महाअवयवदान चळवळ हाती घेतली आहे. सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत 12 हजारहून अधिक नोंदणीकृत रूग्ण आहेत. तसेच, यकृताच्या प्रतीक्षेतही पाच हजारहून अधिक नोंदणीकृत रूग्ण आहेत. त्यामुळे मेंदू मृत (ब्रेन डेड) रूग्णांच्या नातेवाईकांनी मेंदू मृत रूग्णांचे अवयव दान करण्याचा विचार करावा. एका रूग्णाचे सात ते आठ अवयव दान करता येतात. त्या माध्यमातून तितक्याच लोकांना जीवनदान मिळते. हे एक पुण्याचे काम आहे. त्यामुळे अवयवदानासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यावे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शासकीय रूग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या विभागावर अधिक लक्ष आहे. म्हणूनच रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी या विभागाचे प्रयत्न आहेत. सांगलीच्या शासकीय रूग्णालय जुनी इमारत नूतनीकरणासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. अजून 11 कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता देऊ. तसेच, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने शासकीय रूग्णालय आवारात कर्करोग रूग्णांना अद्ययावत सुविधांसाठी नवीन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आय.सी.यु. च्या क्षमतेत वाढ, रक्तघटक संग्रहासाठी रक्तपेढी सुरू करणार असल्याचे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. सुविधा देऊ. बालकांवर उपचारासाठी 80 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच, आयुषच्या माध्यमातून 50 खाटांचे नवीन रूग्णालय आणि दंतवैद्यक महाविद्यालय यांना मान्यता देऊ. शासकीय रूग्णालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा देत असल्याबद्दल त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, येथील शासकीय रूग्णालयात कर्नाटकच्या सीमेवरील जिल्ह्यातून, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून रूग्ण येतात. दररोज अडीच हजारहून अधिक रूग्णांची बाह्य तपासणी होते. येथील अधिकारी व कर्मचारी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तासगाव तालुक्यात खासदार निधीतून डायलिसीस मशीन, सांगली व मिरजच्या शासकीय रूग्णालयात महिलांसाठी स्वच्छतागृह यासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ.पल्लवी सापळे यांनी शासकीय रूग्णालयांतील कामकाजाचा व उद्घाटन झालेल्या विभागांचा थोडक्यात आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. उमेश भोईर यांनी केले.

यावेळी क्ष किरण विभाग, ग्रंथालय, आयसीयु कॉम्प्लेक्स, एच. एम. आय. एस. प्रकल्प, इलेक्ट्रोफिजिऑलॉजी विभाग, पाळणाघर, उपहारगृह, महाराष्ट्र सुरक्षा बल, शुद्ध जल प्रकल्प, युरो सर्जरी विभाग, ज्येष्ठ नागरिक बाह्य रूग्ण विभाग, पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी रूम, ह्युमन मिल्क बँक, योगा हॉल, अन्न छत्र, कर्कराग निदान विभाग, मेडिकल सोशल सर्व्हिस विभाग, नवीन सोनोग्राफी यंत्र, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना विभाग, सायरन यंत्रणा, ए. टी. एम. सुविधा, डायलेसिस सुविधा, लेडिज होस्टेल मध्ये शुद्ध जल प्रकल्प, जनरल विभाग, शरीररचना शास्त्र विभागात सभागृह, दिव्यांग प्रमाणपत्र विभाग, रेडिऑलॉजी विभाग, एच. एम. आय. एस. प्रकल्प, रूग्ण मित्र विभाग, फोटो थेरपी यंत्र विभाग, नवीन नेत्र बाह्यरूग्ण विभाग, पोलीस कक्ष विभाग, बालरूग्ण कक्ष, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग यांचे संयुक्तरीत्या उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शासकीय रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, रूग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result