महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या आदिवासींच्या सुदृढ आरोग्याकरिता फिरते रुग्णालय - पालकमंत्री रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
चंद्रपूर : हजारो वर्षापासून पर्यावरणाचे संरक्षण आदिवासीने केले. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य असून याकरिता ताडोबा शेजारील गावात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता फिरत्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी पिंपळखुट येथे आयोजित फिरत्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा तसेच वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा व सावली या ठिकाणी मुलामुलींचे दोन-दोन वसतिगृहे सुरू केली असल्याचे सांगितले. पिपळखुट याठिकाणी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर शहरात 40 कोटी रुपये खर्चून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने भव्य स्टेडियम निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवक खेळाडू शेडमाके यांच्या प्रेरणेने सराव करतील व जिल्ह्याचे नाव उज्वल करतील. तसेच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे राणी दुर्गावती यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व्हावे यासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतीला 5 टक्के निधी खर्च व्हावा यासाठी प्रयत्न केले. आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे. याकरिता या सरकारने नामांकित शाळा योजना सुरू केली व प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 हजार रुपयांचा शैक्षणिक खर्च सरकारने उचलला. अनेक वर्षांपासून आश्रमशाळांचे प्रतिविद्यार्थी अनुदान हे 900 रुपये होते. परंतु या सरकारने ते वाढवून पंधराशे रुपये प्रति विद्यार्थी केले. गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाकरिता प्रयत्न केले. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोणताही आदिवासी युवक बेरोजगार राहू नये. तर तो रोजगार निर्माण करणारा व्हावा. याकरिता 500 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर कोणताही आदिवासी बांधव पक्क्या घराविना राहू नये. याकरिता 40 हजार घरकुलाची आवश्यकता असून आदिवासी विकासमंत्र्याकडून या अभियानाला विशेष सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक आदिवासी महिलांचे गट तयार झाले असून या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली जाणार आहे. मिशन शौर्य अंतर्गत या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून देशाचा नावलौकिक वाढवला. मिशन मंथन अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आयआयटीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मिशनच्या माध्यमातून आदिवासी युवक रोजगार निर्माण करणारे होतील. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी संबोधित केले. तसेच राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबोधित करताना आदिवासी बांधवांसाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांची सविस्तर माहिती दिली.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेहमी आदिवासी बांधवांच्या हिताची भूमिका घेतली आहे , ते आदिवासी बांधवांचे खरे पाठीराखे असल्याचे डॉ उईके म्हणाले. या कार्यक्रमाला बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, चंद्रकांत धोडरे , वनिता आसुटकर, रोशनी खान, सरपंच विनोद मेश्राम, अशोक आलाम तसेच आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result