महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चंद्रपूरमध्ये लोकसभेसाठी १५ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गुरुवार, १४ मार्च, २०१९
 

पोलीस दल व अन्य आवश्यक सेवेतील अतिरिक्त मनुष्यबळही दिमतीला

चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे.  11 एप्रिल रोजी लोकसभेसाठी चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास दहा हजार कर्मचारी या यंत्रणेत सक्रिय होणार आहेत. यामध्ये पोलीस दलाचे जवळपास 3 हजार तर अन्य सेवा क्षेत्रातील अनुषंगिक गरज लक्षात घेता किमान 15 हजारावर मनुष्यबळ निवडणुकीच्या कामात लागणार आहे. 

जिल्ह्यामध्ये यावर्षी 18 लक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी 1 लाख 49 हजार नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व नवमतदार 11 एप्रिला मतदान करणार असून जिल्हा प्रशासनाला यावेळी मोठ्या संख्येने मतदानाची अपेक्षा आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासनामार्फत यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येत असून लोकशाहीच्या महामेळाव्यामध्ये एक सुजाण नागरिक या नात्याने  आपल्या मताधिकाराचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग लागणार आहे. मात्र तत्पूर्वी देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणामुळे जिल्हा प्रशासनात कामाला वेग आला आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कर्मचारी, अधिकारी काम करीत असून वेगवेगळ्या  जबाबदाऱ्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत. 

जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनामध्ये बल्लारपूर विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 703, चंद्रपूर विधानसभा मतदार संघासाठी 2 हजार 42, राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 916, वरोरा विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 722, वणी मतदारसंघासाठी 1 हजार 471, आर्णी मतदारसंघासाठी 1 हजार 200, तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ब्रह्मपूरी व चिमूर या दोन मतदारसंघासाठी अनुक्रमे 1688, 1641 कर्मचाऱ्यांची वर्णी लागली आहे. 

मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग होणा-या कर्मचा-यांची ही संख्या असून ती दहा हजाराच्या वर जात आहे. मात्र अनुषंगिक यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी व मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती येणार असून त्यानंतर खाजगी क्षेत्रातीलही अनेक मनुष्यबळ या यंत्रणेत सहभागी होत आहे. ज्यामध्ये खानपान व्यवस्थेसह चालक व अन्य बाबींचाही समावेश होतो. याशिवाय जिल्ह्याच्या सुरक्षेची व्यवस्था सांभाळणाऱ्या संपूर्ण पोलिस दलामधील बहुतेक कर्मचाऱ्यांना या काळामध्ये अतिरिक्त काम करावे लागणार आहे. पोलीस दलाचे जवळपास तीन हजार कर्मचारी या व्यवस्थेला लागणार असून या संदर्भातील नियोजन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी करीत आहेत. पोलीस दलासोबत जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांची बैठक झाली असून जिल्ह्यातील तगड्या बंदोबस्ताला सुरुवात झाली आहे. विशेषतः सोशल मिडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे.आक्षेपार्ह पोस्ट अनेकांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे याबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पोलीस विभागाला बूथ कॅप्चरिंग, मारामाऱ्या, बोगस मतदान, मतदान केंद्रावर दहशत निर्माण करणे यांसारख्या घटना टाळून निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान असते.याकरिता मतदानाचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणेत्यांच्याद्वारे तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचारी अन् मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधणे. मोबाईलवर दर तासाला घेतलेला परिस्थितीचा आढावा घेणे, आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलवर फौजफाटा प्रत्यक्ष स्पॉटला लवकरात लवकर पोहोचेल, असे नियोजन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग अन् मतदानाच्या दिवशीचा गोंधळ होऊ शकतो, याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने बोगस मतदान अन इतर गैरप्रकारास आळा घालण्यात पोलिस दलाला मदत मिळणार आहे.  

1950 टोल फ्री क्रमांकाला वाढती मागणी 

लोकसभा  निवडणुकीच्या  घोषणेनंतर सुजाण  नागरीकामार्फत मतदार यादीतील आपल्या नावाची तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून अनेकांनी यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाची मदत घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात 1950 या टोल फ्री क्रमांकाची यंत्रणा गठीत करण्यात आली. याठिकाणी आणि कार्यालयीन वेळेमध्ये मतदार यादी व त्यासंबंधीची माहिती 1950 या क्रमांकावरून दिली जात आहे. याशिवाय ऑनलाईन देखील तक्रारी करता येते. यासाठी सिटीजन सर्विसेस डॉट एनआयसी  डॉट इन ही वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्या मतदानाच्या संदर्भातील तक्रारी नोंदविता येऊ शकते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result