महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी समन्वयाने काम करावे – पालक सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश शुक्रवार, १७ मे, २०१९

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांबरोबरच जनावरंही बेजार झाली आहेत, या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे  यांनी दिले.

सिन्नर तालुक्यातील गुळवंच गावात सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधत असतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी निर्मल, उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, जलसंधारण अधिकारी सागर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तहसिलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड उपस्थित होते.

श्री.कुंटे यांनी चारा छावणी सुरु करणाऱ्या ग्रामविकास फाऊंडेशनच्या सदस्यांसोबत चर्चा करून त्यांच्या शकांचे निरसन केले. शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगला सकस चारा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. छावणीत दाखल होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या जनावरांची छावणी चालकांनी नोंद ठेवावी. जनावरांना शासन निकषानुसार चाराखुराक दे आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही श्री.कुंटे यांनी दिल्या.

छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे टॅगिंग करण्याची सूचना देत पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी आजपर्यंत गुळवंच चार छावणीत 83 जनावरांची नोंद झाली असून त्यात 70 मोठी तर 13 लहान जनावरे असल्याची माहिती चारा छावणी सुरु करणाऱ्या ग्रामविकास फांऊडेशनच्या सदस्यांनी दिली.

जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा,पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चाराछावणी,आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनाबांबत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाऊस पडण्यासाठी आणखी बराच कालावधी बाकी आहेअशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावेत्याचप्रमाणे मागणी नुसार नागरिकांना पाण्याचे टँकर मंजू करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी श्री.कुंटे यांनी गुळवंच येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचे तसेच युवामित्र या सामाजिक संघटनेकडून करण्यात आलेले कुंदेवाडीतील देव नदीवरील नाला खोलीकरण, रुंदीकरण साठवण बंधाऱ्यांची पाहणी केली. कृषि विभागाच्या समुपदेशाने डुबेरे गावातील सोपान पावसे या शेतकऱ्यांच्या डांळीब बागेचे करण्यात येणाऱ्या मलचिंग कामाचे तसेच आशापुर, टेंभूरवाडी येथील वॉटरकप फाऊंडेशन कामाची त्यांनी यावेळी पाहणी केली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result