महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘युथ होस्टेल’च्या कामाला गती द्यावी- प्रवीण पोटे-पाटील मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९
होतकरू विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत सुसज्ज वसतिगृह


अमरावती
: शासनाच्या ‘युथ होस्टेल’ उपक्रमातून जिल्ह्यातील होतकरू युवक- युवतींसाठी लवकरच शहरात सर्व सुविधांनी सज्ज वसतिगृह साकारणार आहे. हे काम निर्माणाधीन असून उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले आहेत.

स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा आदींसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहामुळे वास्तव्यासाठी हक्काचे स्थान मिळणार आहे. वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांच्या राहण्याची अद्ययावत व्यवस्था असेल. राज्य शासनाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शासनाने 4 कोटी रूपये निधीही उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून इमारत आकारास येत आहे. वसतिगृहाची उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मोर्शी रस्त्यावरील विभागीय क्रीडा संकुलाच्या जागेवर युवा वसतिगृहाची इमारत पूर्णत्वास जात आहे. वसतिगृहात सभागृह, करमणूक कक्ष, व्हीआयपी कक्ष आणि 100 व्यक्तींची राहण्याची सोय राहणार आहे. राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी तीन व्हीआयपी कक्षही वसतिगृहात असतील.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result