महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यावरणाची चिंता करण्‍यापेक्षा पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे - सुधीर मुनगंटीवार गुरुवार, २० जुलै, २०१७
  • 20 कोटींच्‍या रस्‍ता बांधकामाचे भूमीपूजन
  • हनुमान टेकडी येथे वृक्षरोपण
वर्धा : राज्‍याला 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्‍ट असताना प्रशासन आणि नागरिकांच्‍या सहकार्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण करुन 5 कोटी वृक्ष लागवड करण्‍यात आली आहे. या वृक्ष लागवडीमुळे आता नागरिकांना पर्यावरणाची चिंता करण्‍याची गरज नसून पर्यावरणाचे सवंर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍त, नियोजन व वन तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हनुमान टेकडी येथे वैद्यकिय जनजागृती मंचाचे वतीने आयोजित वृक्षरोपण कार्यक्रमात केले.

तिरंगा – वृक्ष –जलसंवर्धन अभियानातर्गत आयोजित वृक्षरोपण कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, विश्‍व हिंदी विद्यापिठाचे कुलगुरु गिरीश्‍वर मिश्र, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्‍यक्ष डॉ. सचिन पावडे उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्‍हणाले, पुढील वर्षी राज्‍यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्‍याचे ठरविले आहे. यासाठी आज पासून नियोजन करण्‍यात येत असून 16 कोटी वृक्षरोपे तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नसून वृक्ष संगोपन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. यावेळी त्‍यांनी हनुमान टेकडीवर वृक्षरोपणही केले.

हनुमान टेकडीवर वृक्षरोपण करण्‍यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाने हनुमान टेकडी दत्‍तक घेतली आहे. तसेच जलशुध्‍दीकरणातून वाया जाणाऱ्या अशुध्‍द पाण्‍याचा उपयोग हनुमान टेकडीवरील वृक्षसवंर्धनासाठी तसेच जलसंवर्धन करण्‍यासाठी हिंदी विश्‍व विद्यापिठ आणि प्रशासन काम करीत आहे.

20 कोटीच्‍या रस्‍ता बांधकामाचे भुमीपूजन
बजाज चौक ते महात्‍मा गांधी चौकापर्यंतच्‍या रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण आणि तसेच वर्धा – सेवाग्राम - समुद्रपूर –गिरड- उमरेड या रस्‍त्‍याचे चौपदरीकरणाच्‍या 20 कोटींच्‍या कामाचे भूमीपूजन आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी केले. यासाठी कास्‍टटाईब संघटनेने पालकमंत्री यांचा सत्‍कार करुन आभार व्‍यक्‍त केले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी विलास मून उपस्थित होते.

हुतात्‍मा स्‍मारक येथील विविध कामाचे लोकार्पण
जीवन या शब्‍दामध्‍येच वन हा शब्‍द अंतर्भुत आहे. त्‍यामुळे ज्‍यांना आनंदी जीवन जगायचे आहे. त्‍यांनी वृक्ष लागवड करावी असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिताना केले. निसर्ग सेवा समितीच्‍या वतीने खासदार निधी मधून सेवाग्राम रोड वरील हुतात्‍मा स्‍मारक परिसरातील सरंक्षक भिंत व कुपनलिकेचे पालकमंत्री यांचे हस्‍ते लोकापर्ण करण्‍यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.

सेवाग्राम येथे प्रार्थना सभेस उपस्थिती- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुपारी सर्वप्रथम बापुकुटी येथे भेट देऊन प्रार्थना केली. तसेच परिसरात वृक्षारोपणही केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result