महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तुकाई उपसा सिंचन योजनेने शेतकऱ्यांच्‍या जीवनात आनंद फुलणार- सुभाष देशमुख गुरुवार, ०७ मार्च, २०१९अहमदनगर
:
कर्जत तालुक्‍यातील  शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या भूमीपूजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्‍या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलेल. या अवर्षण क्षेत्रातील एकूण 22 पाझर तलाव व 3 लघु पाटबंधारे योजनांमध्‍ये पाणी सोडून तलाव भरुन त्‍यानंतर पाण्‍याचा पिण्‍यासाठी व सिंचनासाठी उपयोग करण्‍यात येणार असल्‍यामुळे पंचकोशीतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्‍याचे  प्रतिपादन सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

कर्जत तालुक्‍यातील वालवड येथे तुकाई उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, कर्जत पंचायत समिती सभापती पुष्‍पाताई शेळके, अशोक खेडकर, नगरपरिषदेच्‍या नगराध्‍यक्षा प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्‍यक्ष नामदेव राऊतभानुदास बेरड, बाबासाहेब गांगर्डे , शातीलाल कोपनर, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदीजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, मृद व जलसंधारण विभागाचे मुख्‍य अभियंता सुनिल कुशिरे व  जिल्‍हा जलसंधारण अधिकरी कैलास ठाकरे  आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्‍हणाले, कर्जत तालुक्‍यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली तुकाई उपसा सिंचन योजनेचा आज वालवड येथे भूमिपूजन शुभारंभ करण्‍यात आला. या सिंचन योजनेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना निश्चित लाभ होऊन त्‍यांचा आर्थिक स्‍थर उंचावण्‍यास मदत होणार आहे. ही योजना लवकर पूर्ण होण्‍यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रा. शिंदे म्‍हणाले, तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी कुकडी कालव्‍यात115 दशलक्ष घनफुट पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.  शेतकऱ्यांना वीज बिलापोटी भुर्दड बसू नये यासाठी 1 मेगावॅट सोलर प्रकल्‍पाची तरतूद करण्‍यात आली आहे. या प्रकल्‍पामुळे 599 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या प्रकल्‍पास 61 कोटी रुपये खर्च येणार आहे.  कर्जत तालुक्‍यातील 25 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

महाराष्‍ट्रातील पहिली पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणारी तुकाई उपसा सिंचन योजना आहे. पाणीपुरवठा करण्‍याचे पाईपलाईन 1.2 मीटर खोल असल्‍यामुळे शेतकऱ्यांना त्‍याचा अडथळा होणार नाही. तसेच या योजनेसाठी दोन वर्षाचा कालावधी आहे, मात्र हे काम सहा महिन्‍यात पूर्ण करण्‍याच्‍या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्‍या आहे. तुकाई उपसा सिंचनामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्‍न सुटला आहे . तुकाई उपसा सिंचन योजनेचा एका वर्षाच्‍या आत कामास प्रारंभ झाल्‍यामुळे मनापासून आनंद होत आहे. या तुकाई योजनेसाठी आवश्‍यक असलेला निधी उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे सिंचन प्रकल्‍पाचे काम पूर्ण करण्‍यास निधीची अडचण येणार नाही असे यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले.

प्रास्‍ताविकात श्री. कुशिरे यांनी तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी सहा लाईनवरुन 25 तलाव भरण्‍यात येणार आहेत. वीज पुरवठयासाठी सौरउर्जाचा 1 मेगटचा  प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. ही योजना 61 कोटीची असल्याचे त्यांनी सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result