महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; एकूण ८४ टेबलवर होणार मतमोजणी सोमवार, १३ मे, २०१९

नंदुरबार : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत नंदुरबार मतदारसंघातील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात येणार असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

 

नंदुरबार लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडी सिलबंद करून ठेवण्यात आले आहेत. सीआरपी, एसआरपी आणि जिल्हा पोलीस दलाची तिहेरी सुरक्षा व्यवस्था याठिकाणी पुरविण्यात आली आहे.

 

गुरुवार 23 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. मतमोजणीसाठी सहा कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहाक आणि सूक्ष्म ‍निरीक्षक असतील. याप्रमाणे एका कक्षातील 14 टेबलसाठी 20 पथके अर्थात 60 कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहाक ‍निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष देतील.

 

केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए. आणि जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम टपाली आणि  ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. टपाली मतमोजणी 8 आणि ईटीबीपीएस मतमोजणी 2 टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येईल. एकूण 24 ते 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे. (नंदुरबार-27, शहादा-25, अक्कलकुवा-25, नवापूर-25, साक्री-27, आणि शिरपूर-24)

 

मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना  उपस्थित राहता येईल, मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक असेल. मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे प्रतिनिधी नेमावेत व त्यांची ओळखपत्रे निवडणूक शाखेतून प्राप्त करून घ्यावीत, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी कळविले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result