महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकरी आठवडी बाजारांप्रमाणे धान्य महोत्सवासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणार – जिल्हाधिकारी शनिवार, ०६ मे, २०१७
  • गावदेवीच्या पहिल्या महोत्सवात २५ टन धान्य विक्री
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आठवडी बाजार गेल्या वर्षभरात भरविण्यात येऊन शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फायदा झाला, तद्वतच धान्य महोत्सव भरविण्याची कल्पना नाविन्यपूर्ण असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे धान्य बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य असून अशा उपक्रमांना जिल्हा प्रशासनातर्फे बळ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. ते आज पातलीपाडा येथील ऋतू पार्क जवळील ‘माझी आई शाळा’ येथे आयोजित दुसऱ्या धान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

१० मे पर्यंत हा धान्य महोत्सव सकाळी १० ते रात्री १० पर्यंत होणार असून ठाणेकरांनी जसा गावदेवीला धान्य महोत्सवाला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या ठिकाणी द्यावा, असे आवाहन यावेळी आमदार संजय केळकर व मकरंद अनासपुरे यांनी संस्कार व नामच्या वतीने केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पणन विभागाने यापूर्वीच मध्यस्थ हटवून शेतकऱ्यास आपला माल थेट ग्राहकाला विकण्यासंदर्भात पाऊले उचलली आहेत. त्याचा फायदा किती झाला ते आपण ठाणे जिल्ह्यातील ४४ आठवडी बाजारांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. धान्य महोत्सव ही चांगली कल्पना असून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यास अशा माध्यमातून श्रमाचे पैसे थेट मिळणार असतील तर या उपक्रमांना उत्तेजन दिलेच पाहिजे. नाम आणि संस्कार संस्था तसेच इतरही सेवाभावी संस्था पुढे आल्यास त्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. ठाणे जिल्ह्यात ७० लाखापेक्षा जास्त नागरिक शहरी भागात राहतात आणि उर्वरित ग्रामीण भागातले आहेत. शहरी ग्राहकांना थेट शेतकऱ्यांचे दर्जेदार धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असेल तर त्याला निश्चित उदंड प्रतिसाद मिळेल. धान्याचे पॅकिंग व्यवस्थित असावे तसेच बाजारभावापेक्षा कमी दरात आणि दर्जेदार धान्य असेल तर आपली विश्वासार्हता वाढेल.

यावेळी आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, गावदेवीतल्या पहिल्या धान्य महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून केवळ चार दिवसात जवळ जवळ १० ते १२ लाखाची उलाढाल झाली असून २५ टन धान्याची विक्री झाली. या धान्य महोत्सवात गहू, तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, ज्वारी, चवळी, सेंद्रीय हळद, मसाले आदी विविध धान्य - कडधान्य विक्रीस होते. यात गहू ७ ते ८ टन, तूरडाळ ५ ते ६ टन, ज्वारी ६ ते ७ टन, मुगडाळ २ ते ३ टन पर्यंत विक्री झाली अशी माहिती नाम चे मकरंद अनासपुरे यांनी दिली. अमोल गोऱ्हे यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result