महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता संतुलित विकास व्हावा – पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवार, २९ जानेवारी, २०१८
जिल्ह्याच्या सीआरझेड प्रारुपावर सुनावणीस नागरिकांची उपस्थिती
नागरिकांच्या सुचना व हरकतींचा वरिष्ठ पातळीवर विचार व्हावा

ठाणे :
पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता संतुलित असा विकास झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. कांदळवने टिकावीत म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारे आपण प्रयत्न करीत आहोत. पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सीआरझेड संदर्भात आपल्या सर्वांच्या भावना आम्ही लोकप्रतिनिधी वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे पोहोचवू, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

ठाणे जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर जन सुनावणी आज सकाळी नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, महापौर मीनाक्षी शिंदे तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण पर्यावरण विभाग यांचेमार्फत सीआरझेड अधिसुचना 2011 अंतर्गत एकत्रित ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे (CZMPS) बनविण्याचे काम सेस (NCESS) केरळ यांचेमार्फत पूर्ण झाले असून सदर आराखडे प्रसिद्ध करणे त्यावर 45 दिवसात हरकतींवर जन सुनावणी घेण्याचे निर्देश होते.

मी लोकप्रतिनिधी म्हणून या जनसुनावणीस हजर आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, १९६५-७० मध्ये बांधकामे झाली आहेत, याठिकाणी कोळीवाडे देखील आहेत. ती मुंबईच्या धर्तीवर संरक्षित करण्याबाबतीत तसेच सीआरझेड नकाशे तसेच इतर अनुषंगिक बाबींबाबत लोकांच्या सूचनांचा निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर विचार होईल.

खासदार राजन विचारे यांनी देखील बोलतांना सांगितले की, संसदेत लक्षवेधीच्या माध्यमातून मी कायम याविषयी बोलत असतो. हरकतींसाठी अधिक वेळ मिळावा अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या की, विविध संघटना, निम शासकीय, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांनी १८० पेक्षा जास्त हरकती आल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या सुचना व हरकती मांडल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result