महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम : मोफत हृदय शस्त्रक्रिया पूर्वतपासणीसाठी ४८ बालके मुंबईला रवाना बुधवार, २० सप्टेंबर, २०१७
सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटातील सांगली जिल्ह्यातील ४८ बालके मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पूर्व तपासणीकरिता आज मुंबईला रवाना झाली. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई येथे ही पूर्वतपासणी करण्यात येणार आहे.

या बालकांना निरोप देण्यासाठी कृषि व फलोत्पादन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी आवर्जुन उपस्थिती लावून बालकांना शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी व आरोग्य व दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, गोरगरीब रूग्णांसाठी हा एक उपयुक्त उपक्रम असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक बालकाला पाणी, फळे, बिस्किटे असलेले किट भेट देण्यात आले.

यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.प्रमोद चौधरी व त्यांच्या ३२ जणांच्या टीमने मेहनत घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राम हंकारे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अवयव प्रत्यारोपण समन्वयक तथा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे आदि उपस्थित होते.

मागील तीन वर्षापासून गंभीर, अतिखर्चिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांकरिता पात्र असणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू बालकांचे प्रस्ताव मुंबई येथील धर्मादाय संस्था, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्याकडे जमा करून जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांच्यामार्फत वारंवार पाठपुरावा करून अनुदान उपलब्ध करून घेतले जाते. प्रतिवर्षी कमीत कमी दोन वेळा अशा प्रलंबित बालकांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र प्रवासाची व्यवस्था करून बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण करून घेतल्या आहेत. आतापर्यंत मागील ३ वर्षात जिल्ह्यातील ६६५ बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आल्या आहेत. तसेच, ४ हजार ८०० इतक्या इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारिका असे ४ जणांच्या पथकामार्फत लाभार्थींची ही तपासणी करण्यात येते. प्रती २५ हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण ३२ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रास्ताविक डॉ.प्रमोद चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.संजय साळुंखे यांनी केले. यावेळी लाभार्थींच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लाभार्थी मुले, पालक, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result