महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यातील रस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी- चंद्रकांत पाटील रविवार, ०३ मार्च, २०१९शिर्डीत 168.20 कोटींच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन


शिर्डी
: राज्यात रस्ते विकासाची भरीव कामे शासनाने हाती घेतली आहेत. यंदा राज्य शासनाने 30 हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी उपलब्ध करुन दिला असून राज्यात रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

कोल्हार घोटी राज्यमार्गावरील संगमनेर ते बारी या 168.20 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन तयार करण्यात येणाऱ्या हायब्रीड अँन्युटी या योजनेतील रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री  प्रा. राम शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भानुदास बेरड, रामभाऊ जाजू आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याला गेल्यावर्षी रस्ते विकासासाठी 17 हजार कोटीचे बजेट होते. यामध्ये वाढ करुन यंदा 30 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून 1 लाख, 6 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणून त्यामधून गेल्या चार वर्षात 22 हजार किलोमीटरचे सिमेंट क्राँक्रिटचे चार पदरी रस्ते तयार करण्याचा क्रांतीकारी उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या मार्चनंतर रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्रामसडक, राज्य मार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक आदी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर केली आहेत. संगमनेर ते बारी रस्त्याचे काम हायब्रीड अँन्यूटी या योजनेच्या माध्यमातून हाती घेतले असून  काम लवकरात लवकर पूर्ण होईल.

सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी केले. आभार राजेंद्र देशमुख यांनी मानले.

 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result