महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पैशाच्या विकेंद्रीकरणाची व्यवस्था निर्माण करणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवार, ३१ मार्च, २०१८
कारंजा पंचायत‍ सम‍िती व ट्रामाकेअर इमारतीचे लोकार्पण

वर्धा :
शेतकऱ्यांच्या दुख:,वेदना दूर करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कृषि पंपाचे वीज कनेक्शन, सिंचन सुविधा, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत आणि शेतकरी कर्जमाफी करण्यासोबतच शासनाने आता शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा छोट्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पैशाच्या विकेंद्रीकरणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कारंजा येथील पंचायत समितीच्या नवनिर्मीत प्रशासकीय इमारतीच्या तसेच ट्रामा केअरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार अमर काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सभापती नीता गजाम, गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी, माजी आमदार दादाराव केचे आदी उपस्थित होते.

या प्रशासकीय इमारतीसाठी 3 कोटी 21 लाख रुपये तर ट्रामा केअरसाठी 3 कोटी 77 लाख रुपये खर्च करुन वास्तू बांधण्यात आल्या आहेत. या वास्तुंचे लोकार्पण करताना ते म्हणाले, ही वास्तु निर्जीव होता कामा नये, गावाच्या उत्थानासाठी मदतगार ठरणारे कार्य मंदिर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य मार्ग ते पंचायत समिती इमारतीपर्यंतच्या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाख रुपये आणि इमारतीमधील फर्निचरसाठी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात येईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

सन 2000 मध्ये पहिल्यांदा 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तेव्हाच नियोजनपुर्वक शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून धोरणात्मक निर्णय घेतले असते तर शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला नसता. या शासनाने शेतकऱ्यांची महत्त्वाची गरज म्हणजे सिंचनावर भर दिला. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच–सहा वर्षापासून प्रलंबित असलेले कृषि वीज पंपाची वीज जोडणी देण्यावर भर दिला. आता केवळ चालू वर्षाची वीज जोडणी प्रलंबित असून त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

मुंबई-पुणेकडे जाणारा निधी आता समृद्धी महामार्गाद्वारे विदर्भाकडे येईल. हा निधी गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो की नाही यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारंजा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा प्रश्न मुंबईला बैठक लावून सोडविण्यात येईल. तसेच कारागिरांसाठी विद्यापीठ तयार करण्याचा विचार असून यामुळे येथे येणाऱ्या उद्योगासाठी कौशल्यपूर्ण युवक तयार होतील. त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव उद्योजकांना उभे राहण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. आज नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे तयार करण्याची गरज आहे, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी आमदार अमर काळे यांनी ट्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी व डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. बोंडअळी, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज द्यावे, एमआयडीसी जमीन खरेदीसाठी शासनाने परवानगी द्यावी, आदिवासी भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी 220 केव्हीचे उपकेंद्र मंजूर करावे आदी मागण्या केल्या. याप्रसंगी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत तीन बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result