महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवार, १४ एप्रिल, २०१८
सांगली : अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षानिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकास योजनेंतर्गत निवड झालेल्या वाळवा तालुक्यातील रेठरेधरण या गावात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले, तहसिलदार नागेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, उपसरपंच तानाजी पवार, सागर खोत, डी.के. पाटील, नंदकुमार पाटील, भास्कर कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाने रस्ते, गटारी, सौर उर्जा दिवे, पिण्याचे पाणी, समाज मंदिर, वीज पुरवठा, स्वच्छता गृह, गॅस कनेक्शन, स्मशानभूमी, व्यायामशाळा, वाचनालय, महिला बचतगट प्रशिक्षण वर्ग, नविन विहीर खोदणे आदि विविध कामाबाबत आपल्या समस्या व प्रश्न मांडावेत. रेठरे धरण गावात या कामासाठी दीड ते दोन कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन देऊन याबाबतचे प्रस्ताव संबंधितांनी येत्या दोन ते तीन दिवसात सादर करावेत, अशा सूचना दिल्या. तसेच रमाई घरकूल योजनेंतर्गत जेवढे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत ते 100 टक्के पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

प्रास्ताविकात समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकास योजनेंतर्गत असणाऱ्या विविध कामांबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन व आभार संजय घोरपडे यांनी मानले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच रेठरेधरण पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result