महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी - पालकमंत्री दादाजी भुसे बुधवार, ०१ मे, २०१९


महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजारोहण सोहळा संपन्न

धुळे :
महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचिन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन व सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे यासारख्या समाजसुधारकांनी प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्र ही संत- महंत, ऋषी- मुनींची जशी भूमी आहे, तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेवून महाराष्ट्रातील क्रांतिवीर, देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी अनेक जण एक झाले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.


यावेळी पोलीस दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन, गृहरक्षक, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीने संचलन करीत मानवंदना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बनतोडे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, अपर तहसीलदार संजय शिंदे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजारोहण झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), प्रमोद भामरे (निवडणूक), जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, तहसीलदार गणेश राठोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केरळमधील पुराच्या आपत्ती काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अनिल जगन्नाथ ढिवरे यांचा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result