महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र वार्षिकी, लोकराज्यसारख्या प्रकाशनांमुळे लोकांना अद्ययावत, वस्तुनिष्ठ माहिती- एकनाथ शिंदे शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०१७
ठाणे : महाराष्ट्र वार्षिकी, महामानव अशा सारख्या प्रकाशनांमुळे लोकांच्या ज्ञानात भर पाडण्याचे आणि त्यांना वस्तुनिष्ठ माहिती देण्याचे चांगले काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत आहे, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

राज्य शासनाच्या विविध निर्णयांवर आधारित लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री श्री. शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

लोकराज्यच्या चालू अंकामुळे राज्य शासनाने जिल्हा आणि विभागनिहाय घेतलेल्या निर्णयांचे उत्तम संकलन झाले असून शासनाने विविध क्षेत्रात कशा स्वरूपाचे काम केले आहे, ते वाचकांपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहोचवू शकतो, असे पालकमंत्री म्हणाले.

सांसद आदर्श गाव योजनेत लोकराज्यच्या माध्यमातून आपण केंद्र व राज्याच्या चांगल्या योजना तेथील गावकऱ्यांपर्यंत पोहोचवू, असे डॉ. शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र वार्षिकीसारख्या राज्याविषयी अधिकृत माहिती देणाऱ्या पुस्तकाची आवश्यकता होती. याचा फायदा विशेषत: विद्यार्थी, शिक्षक तसेच पत्रकार व माध्यमांनाही संदर्भ म्हणून होणार आहे, असे ते म्हणाले. विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे व जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी या प्रकाशनांविषयी माहिती दिली.

महाराष्ट्र वार्षिकी हे महाराष्ट्राविषयी समग्र माहिती असलेले पुस्तक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केले असून ते सशुल्क जिल्हा माहिती कार्यालयातून मिळू शकते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result