महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्‍य मासिकामुळे व्‍यक्‍तीचे जीवन संपन्‍न होते - एम.एन.डूरे गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०१७
वर्धा : शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्‍य मासिक माणसाचे जीवन संपन्‍न करण्‍याचे काम करीत आहे. यासाठी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी लोकराज्‍य मासिकाचे वाचन करुन स्‍वतःचे भविष्‍य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एल.एम. डूरे यांनी उर्दू लोकराज्‍य मेळाव्‍याच्‍या उद्घाटन प्रसंगी केले.

मौलाना आझाद उर्दू कनिष्‍ठ महाविद्यालय येथे आज उर्दू लोकराज्‍य वाचक मेळाव्‍याचे जिल्‍हा माहिती कार्यालयाचे वतीने आयेाजन करण्‍यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी मौलाना आझाद कनिष्‍ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ईशरतउल्‍ला खान होते तर, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक एल.एम.डूरे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, शिक्षण विभागाचे श्री. रंगारी यांची उपस्थिती होती.

लोकराज्‍य मासिकामध्‍ये सामान्‍य नागरिकांसाठी असलेल्‍या विविध योजना तसेच स्‍पर्धा परीक्षा, स्‍वयंरोजगार याविषयी माहिती असून माहिती मध्‍ये सत्‍यता असते. लोकराज्‍य वाचन करून अभ्‍यास केल्‍यास स्‍वयंरोजगाराची संधी तसेच सामान्‍य नागरिकांची सेवा करण्‍यासाठी शासनाची नौकरी करण्‍याची संधी उपलब्‍ध होऊ शकते, असे श्री. डूरे म्‍हणाले,

अल्‍पसंख्‍यांक नागरिकांना शासनाच्‍या योजनांची माहिती व्‍हावी यासाठी शासनाने उर्दू भाषिक लोकराज्‍य प्रकाशित केले आहे, ही अभिमानाची बाब आहे. यामुळे उर्दू भाषिकांना शासनाच्‍या योजनाची माहिती मिळेल. लोकराज्‍य मासिकाचे नियमित वाचन केल्‍यास उर्दू भाषिक विद्यार्थ्‍यांचा जीवनामध्‍ये माहितीचा शब्‍दसंग्रह वाढून आयुष्‍य उज्ज्‍वल करण्‍यास मदत होईल. प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांने या पुस्‍तकातील माहिती आपल्‍या पालकांपर्यंत तसेच परिसरातील नागरिकांना करून द्यावी आणि मासिकाची माहिती जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहचवून अल्‍पसंख्‍यांक समुदायाला उन्‍नतीच्‍या दिशेने नेण्‍याचे काम करावे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी लोकराज्‍य विषयी माहिती देताना सांगितले लोकराज्‍य हे राज्‍य शासनाचे मुखपत्र असून मराठी, हिंदी ,गुजराती, उर्दू व इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मासिक आहे. या मासिकाचा उपयोग शासनाच्‍या योजनांची माहिती होण्‍यासोबतच विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षेसाठी होतो. आज शासन अल्‍यसंख्‍यांक समाजासाठी अनेक योजना राबविते. कौशल्य विकास, स्‍वयंरोजगार विद्यार्थ्‍यांसाठी शिष्‍यवृत्‍ती, कन्‍या माझी भाग्‍यश्री सारख्‍या अनेक योजनांची माहिती यातून मिळते. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी नियमितपणे वाचन करून आपले भविष्‍य उज्ज्‍वल करावे.

कार्यक्रमाचे संचालन मुम्‍ताज अहमद खान यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result