महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नववर्ष कार्यक्रमात आगीची दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या पालिका, अग्निशमन दलाला सूचना शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७
कार्यक्रमांना परवानगी पूर्वी अग्निसुरक्षेची खातरजमा करावी

ठाणे :
लोअर परेल भागातील कमला मिल कम्पाऊंडमधील इमारतीच्या टेरेसवरील पबला आग लागून झालेल्या दुर्देवी दुर्घटनेत 14 व्यक्तींचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने ठाणे जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिकेतील अग्निशमन अधिकारी, पोलीस यंत्रणा व ठाणे शहरातील मॉल व रिसॉर्टधारक यांची बैठक बोलविण्यात आली होती.

ठाणे जिल्हा हा मुंबई शहरालगत असून येथील शहरात मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागतासाठी समारंभाचे आयोजन केले जाते. त्यामुळे अशा दुर्देवी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याकामी राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, पोलीस विभाग व महापालिका व त्यांच्या अंतर्गत असणारे अग्निशमन विभागांनी पथके तयार करून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करून आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्याबाबत सर्व संबंधितांना अवगत करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी घेणे आवश्यक

या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले की, ठाणे महापालिका मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याची तरतुद असून बंदीस्त क्षेत्रात, आगीच्या संबंधासह कार्यक्रम करणार असतील अशा सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी घेणे आवश्यक आहे.

अग्निशमन परवाना आवश्यक

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे व संबंधित पोलीस विभागांकडे आलेले परवानगी अर्ज त्यांनी संबंधीत महापालिकांकडे पाठवावे व त्यांनी त्या ठिकाणांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 33 खाली संबंधितांना नोटीसा काढून अशा कार्यक्रमासाठी अग्निशमन परवाना आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

एक खिडकी यंत्रणा सुरू करावी

तसेच त्यांच्याकडे अशा परवानांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येणार आहेत ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीने एक खिडकी यंत्रणा सुरू करून सर्व आवश्यक ते निकष तपासून त्वरीत परवानग्या अदा करण्यात याव्यात. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून संबंधीत अग्निशमन दल / संबंधीत उपायुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील, अशा सूचना देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील जनतेने कोठे परवानगी घ्यावी, याबाबत चर्चा झाली असता, राज्य शासनाची http://www.mahafireservice.gov.in असे संकेतस्थळ असून यावर ऑनलाईन अर्ज करून परवानगी मिळविण्याची सुलभ सुविधा असल्याचे सांगण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result