महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील पात्र ९७ हजार शेतकऱ्यांची माहिती संकलित : डॉ.सुभाष भामरे रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९
धुळे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये धुळे जिल्ह्यातील 678 गावांपैकी 590 गावांतील शेतकऱ्यांचा डाटा हा ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला असून यातील 97 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती संकलित करण्यात आली असून कृषी सन्मान योजनेच्या 6 हजाराच्या अनुदानापैकी पहिला हप्ता रुपये प्रत्येकी दोन हजार जमा करण्यात येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील आठ दिवसांत पहिल्या हप्त्याचे अनुदान जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी महाविद्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, कृषी विस्तार केंद्राचे एम. एस. महाजन, कृषी महाविद्यालयाचे डॉ. सी. व्ही. पुजारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, डॉ. पंकज पाटील, डॉ. जगदिश काथेपुरी उपस्थित होते. सुरवातीला पुलवामा (जम्मू- काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी बोलताना डॉ.भामरे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम आगामी काळात पाहावयास मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बी- बियाणे, खते घेण्यासाठी हा निधी उपयोगात येईल, असेही त्यांनी सांगितले.


अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. आतापर्यंत सरासरी एक लाख शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यांना योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उर्वरित शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result