महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कामगारांच्या श्रमातूनच देशाची वैभवता - मदन येरावार रविवार, ३० जुलै, २०१७
वर्धा : देशाच्या जडणघडणीत कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या श्रमातून देशाला आज वैभवता मिळाली आहे. हेच कामगार उद्या देशाला महाशक्ती बनवतील, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा, पर्यटन व बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केले.

शहरातील अनेकांत स्वाध्याय मंदीर येथे बांधकाम कामगार मेळावा व अनुदान वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. उद्घाटक म्हणून मदन येरावार उपस्थित होते. तर खासदार रामदास तडस, जि.प.अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ.पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की, सर्वसामान्य गरीब, शेतकरी, मजुर यांच्यासाठी सरकारच्या अनेक योजना सुरू आहेत. राज्यातील युती सरकारने योजनाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली. निधीची कमतरता ही भासू दिली नाही. गवळी कामगारांसाठी सरकारच्या अनेक योजना आहे. दुसऱ्यांचे घर निर्माण करणाऱ्या कामगारांना आज स्वत:चे हक्काचे घर नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांच्यासाठी स्वत:चे घर निर्माण करण्यात येईल.

बांधकाम कामगारांना मंत्री म्हणून नाही तर स्वत:हून ही सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. खा.रामदास तडस म्हणाले की, राज्याप्रमाणे केंद्राच्याही योजना बांधकाम कामगारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. काही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. आमदार पंकज भोयर म्हणाले की, दरवर्षी या पद्धतीचे मेळावे कामगारांसाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत. कामगाराला न्याय देणे हा मूळ उद्देश आजच्या मेळाव्याचा आहे. आज प्रतिनिधीक स्वरुपात काही जणांना अनुदान देण्यात येत आहे. मात्र सोमवार पासून सर्व 15 हजार कामगारांच्या खात्यात रक्कम जमा होईल. काही अडचण आल्यास कामगारांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यावेळी राजेश बकाने व जि.प अध्यक्ष नितीन मडावी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. संचालन यशवंत झाडे यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result