महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सुखकर्ता बंधाऱ्याचे काम हे पोलीस दलाचे रचनात्मक काम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १९ मे, २०१७
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सांगली : गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीने ध्वनी प्रदूषण करण्याऐवजी जलसंचयाकरिता निधी दिला. जिथे जलसंचय होईल त्याच ठिकाणी समृद्धी येईल, हा मंत्र समजून सांगली पोलीस विभागाने काम केले आहे. सुखकर्ता बंधाऱ्याचे काम हे पोलीस दलाचे रचनात्मक काम असून यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडेल. इतरही ठिकाणी सर्वांनी अशा प्रकारचा पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

जलयुक्त शिवार अभियान 2016-17 अंतर्गत बांधण्यात आलेल्या मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथील सिमेंट नाला बांधाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. पोलीस विभागाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवून जमा केलेल्या निधीतून हा बंधारा बांधण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार डॉ.सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलीस टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुखकर्ता बंधाऱ्याचे काम अतिशय मूलभूत आहे. जर पाणी थांबले, मुरविले, जमिनीत गेले, पाण्याची पातळी वाढवली तर शेतकरी समृद्ध होऊन अर्थव्यवस्था मजबूत होते. अशा मूलभूत कामामध्ये पोलीस विभागानेही पुढाकार घेतला आहे. शिव बंधारा, भीम बंधारा, दुर्गा बंधारा ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. ध्वनी प्रदूषण करण्याऐवजी एक रचनात्मक काम करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये या पाण्यातून परिवर्तन आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे, पोलीस विभागाचे व गावच्या नागरिकांचे अभिनंदन केले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलीस दलातर्फे डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करण्यात आले होते. डॉल्बीमुक्तीकडून जलयुक्तकडे या नाविन्यपूर्ण आणि अभिनव योजनेच्या आवाहनास जिल्ह्यातील 863 गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून 27 लाख 80 हजार रुपयांची रक्कम उभी राहिली. ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेस मदत म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या जमा रकमेतील 13 लाख 24 हजार 791 रुपयांतून मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे सिमेंट बंधारा बांधण्याकामी खर्च करण्यात आले. या बंधाऱ्यास सुखकर्ता बंधारा असे नाव देण्यात आले. या बंधाऱ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियान 2016-17 अंतर्गत मिरज तालुक्यातील सिमेंट नाला बांध मल्लेवाडी (यल्लमा मंदिर) चे काम प्रस्तावित करण्यात आले होते. हे काम मार्च 2017 मध्ये पूर्ण झाले आहे. या सिमेंट बंधाऱ्याची लांबी 30 मीटर आहे. उंची 1.75 मीटर असून पाणीसाठ्याची क्षमता 7.50 सघमी (सहस्त्र घन मीटर) आहे. यामुळे 9 विहिरी व विंधन विवरे यांना फायदा होणार आहे. मल्लेवाडी गावातील मुख्य नाल्यावर हा सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे. सिमेंट बंधारा बांधण्यापूर्वी पावसाचे तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी या नाल्यातनू वाहून जात होते. हा सिमेंट बंधारा बांधल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून शेतीसाठी तसेच विहिरीची व कूपनलिकांची पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result