महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुरगूडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार- चंद्रकांत पाटील सोमवार, ०४ मार्च, २०१९


कोल्हापूर : मुरगूडचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवालयाच्या विकासासाठी आवश्यक असणारा दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन मुरगूडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुरगूड नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा व ग्रामदैवत श्री अंबाबाई देवालयाचा सांस्कृतिक हॉल बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक आदी उपस्थित होते.

यावेळी दोन कोटी रुपये खर्चाचे रस्ते विकास व सव्वा कोटी रुपयांच्या गटारी बांधकामाचा शुभारंभ पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. पाटील म्हणाले, श्री अंबाबाई देवालयासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 67 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामधून उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज व लोकोपयोगी सांस्कृतिक हॉलचा मुरगूडवासियांना फायदा होईल. मुरगूडच्या रखडलेल्या विकास कामांसाठी तसेच रस्त्यांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असून शेतकरी, युवक, महिला, देशाची सुरक्षा आदींबाबतचे विधायक निर्णय घेत आहेत. त्याचप्रमाणे जनतेच्या कल्याणसाठी हे शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

समरजितसिंह घाटगे, माजी आमदार श्री. घाटगे, श्री. मंडलिक यांनी मनोगतामध्ये मुरगूडच्या विकास वाटचालीवर लक्ष केंद्रीत करुन पुढील विकासासाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्धतेसाठी कायम पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील जास्तीत जास्त नवउद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून त्याचा जास्तीत जास्त नवउद्योजकांनी लाभ घ्यावा. प्रास्ताविक नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result