महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करा - मुख्य सचिव दिनेशकुमार जैन बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिले.

जिल्हाधिकारी सभागृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीत मुख्य सचिव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जे.डी. कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी अमीत शेडगे, उपविभागीय अधिकारी चिपळूण कल्पना जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी जयकृष्ण फड, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य सचिव म्हणाले आपल्या राज्याचा एकूण बजेटचा विचार करता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त खर्च होत आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त शासकीय काम कसे करता येईल ते पहा. यासाठी कार्यालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करा. जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेताना ते म्हणाले आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये जेथे आपल्या पुढील पिढीचं भवितव्य अवलंबून आहे त्या खात्यामध्ये रिक्त पदे भरणे गरजेच आहे आणि ती भरण्यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही करु.

शासनाकडून सामान्य जनतेसाठी मुद्रा बँक योजना, जनधन योजना इ. यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकमेकांबरोबर समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना तळगळातील जनतेपर्यंत कशा पोहचतील ते बघितलं पाहिजे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रत्येक विभागाने टीम म्हणू काम केले पाहिजे.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. यावेळी सातबारा संगणीकरण, महसूल रेकार्ड स्कॅनींग, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या २४ X ७ उपक्रम, शासकीय वसुली, मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी -मिऱ्या - नागपूर महामार्ग, जयगड - डिंगणी रेल्वे प्रकल्प आदी बाबंत मुख्य सचिव महोदयांना माहिती दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनीही आरोग्य विभागात औषधे वेळवर उपलब्ध न होणे, पाणीपुरवठा, बांधकाम विभागातील रिक्त पदे इ. समस्यांबाबत मुख्य सचिव महोदयांबरोबर चर्चा केली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे येण्यापूर्वी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी मजगाव रोड विमानतळाची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीपूर्वी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result