महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रायगडमधील विविध मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी दाखल सोमवार, २२ एप्रिल, २०१९


सकाळी ७ ते सायंकाळी ६ मतदान मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावावा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

रायगड - अलिबाग :
लोकसभा निवडणुकीसाठी ३२ रायगड मतदारसंघात मंगळवार (२३ एप्रिल) रोजी मतदान होत असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ आहे. अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. विविध मतदान केंद्रांवर आज अलिबागहून सकाळपासून अधिकारी व कर्मचारी यांची पथके मतदान साहित्य घेऊन रवाना झाली. तर इतर ठिकाणांहून येथे कर्मचारी दाखल झाले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही आज सकाळी जेएसएम महाविद्यालायामागील प्रांगणात भेट देऊन स्वत: सर्व व्यवस्थेची खातरजमा करून घेतली तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

एकूण २१७९ मतदान केंद्रांवर १ मतदान केंद्राध्यक्ष, १ प्रथम मतदान अधिकारी, २ इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. याशिवाय मतदानासाठी सहाय्य करणारे आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस आणि इतर असे सुमारे १५ हजार कर्मचारी देखील आपापल्या मतदान केंद्रांवर व निश्चित केलेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत.

कर्मचाऱ्यांना सर्वसुविधा
आज सकाळपासूनच जेएसएम महाविद्यालायामागील प्रांगणात अलिबागहून इतर मतदान केंद्रांवर जाण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग सुरु होती. प्रांगणात मोठा मंडप टाकला होता तसेच येणाऱ्या व जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता, भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवारही जातीने लक्ष देऊन होत्या.

एस.टी.बसेस, मिनी बसेस सज्ज
या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ तालुक्यातून ने - आण करण्यासाठी ५४८ एस टी बसेस, ८० मिनी बसेसची व्यवस्था केली होती. या बसेस कुठून सुटणार तसेच कुठे पोहोचणार वगैरे बाबी तहसील कार्यालयामार्फत संबंधिताना कळविण्यात आल्या होत्या. प्रत्येक तालुक्यात एका समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक बसेसवर देखील बॅनर्स लावलेले होते. एस.टी.महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी देखील नियोजनात व्यस्त होते.

साधारणत: एका एस.टी.बस मधून ६ मतदान केंद्रांवरील कर्मचारी जातील अशी व्यवस्था केली होती. वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यवर लक्षही ठेवण्यात येत होते.

ही ११ कागदपत्रेही मतदानासाठी चालतील
मतदान ओळखपत्र नसले तरी मतदार मतदान करु शकता. त्यासाठी विविध अकरा कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले स्मार्ट ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रे, आमदार/खासदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाईल. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी मतदारांनी १९५० हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा https://raigad.gov.in/en/election-department/ किंवा https://www.nvsp.in/ या संकेतस्थळांना भेट द्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result