महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दिव्यांगांचे मतदान वाढण्यासाठी प्रयत्न करा; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना गुरुवार, ११ एप्रिल, २०१९


सोलापूर :
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांचे मतदान वाढण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माढा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव आणि उपायुक्त जयंत पिंपळगावकर उपस्थित होते.

डॉ. भारुड यांनी जिल्हा स्वीप समितीच्यावतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांचे मतदान होईल यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करा. सोलापूर जिल्ह्यात कन्नड आणि ऊर्दू भाषकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भाषिकांपर्यत पोहोचण्यासाठी स्वीपचे जिंगल्स कन्नड आणि ऊर्दू भाषेत करा. होर्डिंग्ज आणि बॅनर कन्नड आणि ऊर्दू भाषेत लावा. त्यावर मतदानाची वेळ आवर्जून उल्लेख करा.

जिल्ह्यातील सर्वात कमी मतदार झालेले मतदान केंद्र निश्चित करुन मतदान का कमी झाले याची कारणमीमांसा करा. त्यानुसार स्वीपचे कार्यक्रम करा. शहरातील कमी मतदान होणारे वॉर्ड निश्चित करुन त्यानुसार जनजागृती करा, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजीत देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, महापालिकेचे उपायुक्त संजय मायकलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result