महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
देशातील प्रत्येक विकलांगाला शासनाची मदत- खासदार रामदास तडस रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७
वर्धा : दिव्यांगाची सेवा हीच इश्वर सेवा समजून देशातील प्रत्येक विकलांगाला मदत करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. शासन दिव्यागांना असलेल्या व्यंगानुरुप अपंग साहित्य वाटप, नोकरीमध्ये आरक्षण, व्यवसासाठी अनुदान, आरोग्यासाठी तसेच वृद्धांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकालांगांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित सामाजिक अधिकारिता शिबीर व निशुल्क सहाय्यक उपकरण वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, अपर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, देवळी नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार, एलिम्कोचे महाव्यवस्थापक श्री. अशोक यांची उपस्थिती होती.

श्री. तडस म्हणाले, केद्र शासनाने वृद्धासाठी वयस्वी योजना सुरु केलेली असून या योजनेचा जिल्ह्यातील वृध्दांना लाभ व्हावा यासाठी लवकरच जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम या कंपनीच्या वतीने जिल्ह्यात समुद्रपूर, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू व वर्धा येथे दिव्यागांची नोंदणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 5 हजार दिव्यांगाची नोंदणी करण्यात आली. यातील पात्र अशा 2 हजार 121 दिव्यांगाना अपंग साहित्याचे वितरण करण्यात आले. यानंतर काही नोंदणी न झालेल्या दिव्यांगासाठी लवकरच हिंगणघाट येथे शिबिराचे आयोजन करुन अपंग साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. नगर परिषदेने व जिल्हा परिषदेने प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 3 टक्के निधी अपंगाच्या कल्याणासाठी वापरावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

श्री.नवाल प्रास्ताविक करताना म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दिव्यांग सशक्तीकरण योजना पोहोचत असून या योजनेसोबतचा इतर योजनेचा सर्व दिव्यांगाना लाभ देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील 4 हजार 500 दिव्यांगाना विमा, 4 हजार 200 दिव्यांगाना कार्ड , 2 हजार 121 दिव्यांगाना अपंग साहित्य वाटप करण्यात आले. तसेच उर्वरीत दिव्यांगाना पुढील शिबिरात वितरीत करण्यात येणार आहे. या शिबाराची आशा व अंगणवाडी सेविका यांनी जनजागृती करुन दिव्यांगांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते समीर राऊत व भास्कर राऊत -स्मार्ट फोन, शोभा पवार व सुनिता पूणेकर - ट्रायसिकल, मयूरी सेलवटकर -कॅलीपर व्हीलचेअर, मारुती धोटे -कर्ण यंत्र, निखिल -बेल किट, शिवानी – शिवानी व प्रमोद – एम.एस.आय.ई.डी. किट, संतोष बाभुळकर- कृत्रिम पाय, अशोक आढाऊ- ए.डी.ए.एल.किट, सुमन यांना स्मार्ट किटचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

तत्पूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. थावरसिंह गेहलोत हे दूरध्वनीव्दारे संदेश देताना म्हणाले, दिव्यांग सशक्तीकरण योजनेअंतर्गत देशातील दिव्यागांना 1 करोड 39 रुपयाचे अपंग साहित्य वितरित करण्यात आले. आठ लाखापेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. तसेच नोकरीमध्ये 4 टक्के आरक्षणाची सुविधा देण्यात येत असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result