महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
“महाराष्ट्र वार्षिकी” स्पर्धा परीक्षा संदर्भासाठी उपयुक्त - आयुक्त डॉ. पाटील शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०१७
नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेली “महाराष्ट्र वार्षिकी २०१७” ही पुस्तिका संदर्भासाठी उपयुक्त असून महासंचालनालयाचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी केले.

कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांनी डॉ.पाटील यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र वार्षिकी २०१७”, महामानव, माहे सप्टेंबरचा लोकराज्यचा अंक, आपले जिल्हे विकासाची केंद्रे, महाकर्जमाफी तसेच कोकण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर जिल्ह्याच्या आपला जिल्हा या पुस्तिका भेट दिल्या.

डॉ.पाटील म्हणाले, “महाराष्ट्र वार्षिकी” ही पुस्तिका विद्यार्थी, पत्रकार, अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षा यांना संदर्भासाठी निश्चितच उपयुक्त आहे. यामध्ये देण्यात आलेली जिल्ह्यांची अधिकृत सांख्यिकी माहिती, जिल्ह्याची वैशिष्ट्य, पर्यटन, उद्योग, राज्य शासनाच्या विविध विभागाबाबतची माहिती शासकीय कार्यालयांनाही निश्चितच उपयुक्त आहे. राज्य शासनाने गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये राबविलेल्या योजना व निर्णय याबाबतचा आढावा घेणारा लोकराज्यचा सप्टेंबर विशेष अंक माहितीपूर्ण आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर लोकराज्यच्या आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या अंकामधील लेखामधून तयार केलेली महामानव ही पुस्तिका संग्रहासाठी उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र वार्षिकी व महामानव या पुस्तिका कोकण विभागातील जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांनी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result