महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महालक्ष्मी सरस - 2017 : प्रदर्शन व विक्री वांद्रे रेक्लमेशन येथे 11 जानेवारी पासून सुरु मंगळवार, १० जानेवारी, २०१७
ठाणे : देशातील व विविध राज्यांतील महिला स्वयंसहाय्यता गट आणि ग्रामीण कारागीर यांनी उत्पादित व हस्त कौशल्याने निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे ठिकाण असलेल्या महालक्ष्मी सरसचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव, यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 11 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता वांद्रे रेक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र.1, लिलावती हॉस्पीटल समोर, वांद्रे (प.) मुंबई येथे होत आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर विनोद तावडे, ग्राम विकास महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे, ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आणि विशेष अतिथी लोकसभा सदस्य पूनम महाजन, विधानसभा सदस्य ॲड.अशिष शेलार, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य स्वाधीन क्षत्रिय, ग्राम विकास व पंचाराज विभाग सचिव असीम गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचे आयोजन ग्राम विकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.

महालक्ष्मी सरस ग्रामीण भारताचे जतन करून ठेवलेल्या पारंपरिक कलेचा निखळ वारसा पाहण्याची संधी मिळणार असून या प्रदर्शनात भारतातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू काश्मिर, उत्तरप्रदेश, तामिळनाडू व कर्नाटक, बिहार, हरियाणा, केरळ, पाँडेचरी, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा, हिमाचल प्रदेश, नागालँड, झारखंड, उत्तराखंड, सिक्कीम इत्यादी विविध राज्यांतून आलेल्या महिला स्वंयसहाय्यता गटांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार करण्यात आलेल्या विक्री वस्तूचे स्टॉल व खाद्यस्टॉल, असे एकूण 500 स्टॉल लावण्यात आहे आहेत. यासाठी आपण संपूर्ण भारतातील कारागिरांना व महिला स्वंयसहाय्यता बचत गटांना प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या वस्तू विक्रीची संधी तसेच कलादेखील स्वयंसहाय्यता गटाकडे असून या स्वप्न नगरीत पहायला मिळणार आहे.

महालक्ष्मी सरस-2017 च्या प्रदर्शनात आंध्रप्रदेश मध्ये तयार होणाऱ्या पोचमपल्ली, हस्तकला, चामडी कारपेटस व लॅम्पशेडस, ड्रेस मटेरीयल इत्यादी वस्तू, मध्यप्रदेश मध्ये तयार होणाऱ्या ज्यूट पासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम, कलात्मक वस्तू, चंदेरी साड्या, मध, चामडी कलाकृती, टेराकॉट इत्यादी, गोवा मध्ये तयार होणाऱ्या नारळापासून काथ्या व शंख, शिंपल्यापासून तयार केलेल्या वस्तू, भरत काम व नक्षीकाम इत्यादी, राजस्थानमध्ये तयार ब्ल्यू पॉटरी, टेराकॉट, मोजडी भरतकाम केलेले बेडशीट्स, दागिने, धातूशिल्पे, गुजरातमध्ये तयार होणाऱ्या साड्याआकर्षक काचकाम, बीडकाम, भरतकाम, मातीची भांडी इत्यादी, पंजाबमध्ये तयार होणाऱ्या फुलकारी, पंजाबी पादत्राणे, पारंपरिक ड्रेस मटेरियल इत्यादी, जम्मू काश्मिर मध्ये तयार होणाऱ्या पश्मिना शॉल, भरतकाम, लोकरी वस्तू, कलाकुसारीच्या वस्तू, केशर, पांरपरिक ड्रेस मटेरियल इत्यादी, उत्तरप्रदेश मध्ये तयार होणाऱ्या चिकन वर्क, जरी वर्क, हस्तकला, हस्तशिल्प, जाजम, कारपेट इत्यादी, तामिळनाडू व कर्नाटकमध्ये तयार होणाऱ्या सिल्क साड्या, हस्तकला इत्यादी, बिहारमध्ये तयार होणाऱ्या खास मधुबनी पॅटीग्ज, कारपेट इत्यादी, हरियाणामध्ये तयार होणाऱ्या वस्तू टेराकोटा, भरतकाम केलेली वस्त्रे, हस्तकला वेत व बांबूपासून बनविलेले फर्निचर इत्यादी, केरळ राज्यात तयार होणाऱ्या वस्तू कॉटनसाडी, काथ्यापासून तयार केलेल्या वस्तू इत्यादी, पाँडेचरीमध्ये तयार होणाऱ्या वस्तू कॉटनसाडी, हस्तकला, शंख शिंपल्यापासून वस्तू, आसाम राज्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू केन व बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, पश्चिम बंगालमध्ये तयार होणाऱ्या वस्तू ज्यूट पासून बनविलेल्या कलात्मक वस्तू, कलकत्ता साडी, ओडिशा मध्ये तयार होणाऱ्या वस्तू कापडावरील नक्षीकाम, लाकडावरील पेंटिंग, हस्तकला इत्यादी, हिमाचल प्रदेशमध्ये तयार होणाऱ्या वस्तू कलात्मक दागिने, भरतकाम, धातूशिल्प, हस्तकला इत्यादी, नागालँडमध्ये तयार होणाऱ्या वस्तू कृत्रिम शोभावंत फुले, झारखंडमध्ये तयार होणाऱ्या वस्तू धातूशिल्प, हस्तकला, उत्तराखंडमध्ये तयार होणाऱ्या आर्युवेदीक औषधे, सिक्कीममध्ये तयार होणाऱ्या वस्तू आकर्षक ड्रेस मटेरियल इत्यादी वस्तूचे स्टॉल लागणार आहेत.

या प्रदर्शनात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत महिला स्वंयसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर यांनी उत्पादित केलेल्या त्यांच्या वस्तूच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामध्ये कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटींग, तृण- कडधान्य, सुकामेवा, भिंतीवरील तोरणे, पैठणी साडी पेपर मॅशी, आर्युवेदीक उत्पादने, मातीची भांडे, तसेच मुंबईकरांसाठी अस्सल ग्रामीण स्वाद व चव असलेले स्वादिष्ट खाद्यपदार्थ, लोणची, कुरडाई, पापड, गोडांबी, सोलापूरची चटणी, पुण्याची मासवडी, जात्यावर दळलेली तयार सेंद्रिये पिठे, तर झुणका भाकर, मोदक, थालीपीठ, फीश थाळी, पांढरा तांबडा रस्सा, कोंबडी वडे, खानदेशी मांडे इत्यादी वस्तूंचा आस्वाद आपल्याला घेता येईल.

या प्रदर्शनात मनोरंजन, सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत प्रख्यात पार्श्वगायकांसह, सदाबाहर गीते, देशभक्तीपर गाणी व महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविणारे लावणी, गझल, वाघ्या मुरळी, कोळी नृत्य इत्यादी मनोरंजन व कलाविष्कांराचा आनंद घेता येईल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result