महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रशासन, पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून विकासाच्या कामाला गती- विभागीय आयुक्त डॅा. भापकर शुक्रवार, १३ ऑक्टोंबर, २०१७
बीड : जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा सहभाग मिळाल्यास निश्चितच गती मिळेल, असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावरील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, श्रीमती वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपायुक्त प्रल्हाद कचरे, श्री.बोथरा, श्री.कुंभार, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुत्रावे, श्रीमती रिता मेत्रेवार, मनोज चौधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जि.प.सभापती युद्धजित पंडित, संतोष हांगे आदींची उपस्थिती होती.

डॉ. भापकर म्हणाले की, शासनस्तरावरुन विविध योजना राबविल्या जात असून त्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची कामे झाली पाहिजेत. यासाठी विकासाच्या कामामध्ये अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग असल्यास तो जिल्हा विकासामध्ये अग्रेसर राहण्यास निश्चितच मदत होईल. जिल्ह्याचे महसुली वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामांना प्राधान्य देण्याची गरज असून दिलेले उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावे. तसेच जिल्ह्यातील वाळू लिलावाबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाच्या माध्यमातून अचानक प्रत्यक्ष भेटी देऊन कारवाई करावी. जिल्ह्यातील एनएलआरएमपीचे काम कमी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.

जिल्ह्यात नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यवाही पूर्ण करावी. तसेच विहिरी व शेततळ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करुन लवकरात लवकर जिल्हा हागणदारीमुक्त करावा. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुलांना शिक्षकांनी चांगले शिक्षण दिले पाहिजे. चांगली सुविधा, उपक्रम तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शाळा डिजीटलायझेशनच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महसूल आयुक्तांनी महाराजस्व अभियान आढावा, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, वक्फ जमिनीच्या नोंदी, शेतकरी आत्महत्या, शासकीयवसूली, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीस दंडात्मक कार्यवाहीचा आढावा, महसूली जमा व शासकीय भरणा प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, नरेगाच्या कामांचा आढावा, जलयुक्त शिवार कामाचा आढावा, जीओ टॅगींग, पुरवठा विभागाचा आढावा, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी कल्याण अभियान यासारख्या विविध विषयावर डॉ.भापकर यांनी आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या.

श्री.सिंह यांनी जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विकासाची कामे आणि देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result