महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावे - राजाराम माने शनिवार, १९ मे, २०१८
नाशिक : मान्सून कालावधीत प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवावेत. नियंत्रण कक्षातील दूरध्वनी व वीज सेवादेखील अखंडपणे कार्यान्वित राहतील याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पुर्वतयारी विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, किशोरराजे निंबाळकर, राहुल दिवेदी, मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, सुनील माने, उपायुक्त रघुनाथ गावडे, धुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन आदी उपस्थित होते.

श्री. माने म्हणाले, पुराचा संभाव्य धोका लक्षात नदी किनाऱ्या लगतच्या वसाहतीस सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे पूर्वनियोजन करण्यात यावे. तसेच मान्सून काळात दूरसंचार, विद्युत वितरण विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह सर्व संबंधित विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पालन करण्यात यावेत, अशा सूचनाही श्री. माने यांनी दिल्यात.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. विभागातील जिल्हाधिकारी यांनी जिल्हापातळीवर केलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच जलसंपदा विभागचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांनीदेखील जलसंपदा विभागामार्फत मान्सून काळात करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. नाशिक महानगरपालिका अग्नीशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मान्सून पूर्व तयारीची माहिती दिली.

यावेळी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदूरबार जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक विद्युत वितरण कंपनी, नाशिक व धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक दूरसंचार विभाग, आकाशवाणी स्टेशन प्रबंधक आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result