महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून बालकांना मिळाले नवजीवन बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
विशेष लेख :

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अतिखर्चिक व गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियांबरोबरच अन्य शस्त्रक्रिया झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक रूग्ण बालकांना आशेचा किरण मिळाला आहे. नवजीवन मिळाले आहे. या कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 964 लाभार्थींपैकी 673 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तर 6095 पात्र लाभार्थींपैकी 4535 पात्र लाभार्थींवर इतर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.


जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, तत्कालिन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आशा कुडचे, जिल्हा समन्वयक डॉ.प्रमोद चौधरी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची संपूर्ण टीम झोकून देऊन काम करत आहे. परिणामी अनेक बालक रूग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात एकूण 32 पथके कार्यरत आहेत. एक पुरूष आणि एक महिला वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता आणि परिचारिका असे चार जणांचे पथक असते. या पथकाकडून 0 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. शाळा व अंगणवाडीसाठी प्रति 25 हजार पटामागे एक आरोग्य तपासणी पथक असते. प्रत्येक पथकाकडून वर्षातून एकदा शाळा तपासणी व दोनदा अंगणवाडी तपासणी केली जाते. तसेच, लाभार्थींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिखर्चिक व गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियांचा पात्र व गरजू लाभार्थींना लाभ देण्यात सांगली जिल्हा अग्रेसर आहे.

हृदय शस्रक्रियेच्या प्रकारानुसार किमान 75 हजार रुपये ते दीड लाख रुपये निधी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात हृदय शस्रक्रियेकरिता चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, या शस्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने मुंबई येथील अद्ययावत सुविधा असलेल्या रूग्णालयांतच पूर्ण होऊ शकतात. ग्रामीण आणि अशिक्षित भागातील पालकांना ते गैरसोयीचे आणि खर्चिक असते. पालक अनेक वर्षे विविध रूग्णालयांत या शस्रक्रियांसाठी हेलपाटे घालत होते. मात्र, त्यांची दाद घेतली जात नव्हती.

दुसरीकडे अपुऱ्या अनुदानाअभावी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या हृदय शस्रक्रिया सन 2013 पासून प्रलंबित होत्या. आवश्यक निधी उभारण्यास विलंब व तांत्रिक अडथळे निर्माण होऊ लागल्याने गरजू बालकांच्या तब्येतीत गुंतागुंत निर्माण होऊ लागली होती.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे याबाबतची अडचण अधिकाऱ्यांनी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत सूचित करुन सर्व बालकांच्या शस्त्रक्रिया तात्काळ पूर्णपणे मोफत करुन देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर या हृदय शस्रक्रियांना गती आली.

सन 2014-15 मध्ये 25, सन 2015-16 मध्ये 86, सन 2016-17 मध्ये 85, सन 2017-18 मध्ये 60 बालकांवर हृदय शस्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्याने आजअखेर 673 पैकी 221 ओपन हार्ट शस्रक्रिया मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय संस्था, फोर्टिस हॉस्पिटल, दिल्ली यांच्याकडून निधी जमा करून केल्या आहेत. तर इतर 452 शस्रक्रिया सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

शस्रक्रिया पूर्ण झालेल्या बालकांना मेक ए विश या मुंबईतील सेवाभावी संस्थेमार्फत सायकल, एल.सी.डी. टीव्ही मोफत भेट देण्यात आले आहेत. प्रवास, शस्रक्रियापूर्व तपासण्या, रूग्णालय नोंदणी शुल्क, भोजन, निवास इत्यादि सुविधा मोफत देण्यात आल्याने गरीब, गरजू लाभार्थींचा राज्य शासन व प्रशासनावरील विश्वास दृढ झाला आहे. यामुळे रूग्ण बालकांना न्याय मिळाला असून, त्यांचा पुनर्जन्म झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- संप्रदा द. बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result