महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
माहिती व जनसंपर्कच्या ‘संवादसत्र’ उपक्रमात समाज माध्यमांवरील चर्चा रंगली रविवार, ११ मार्च, २०१८
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग

ठाणे :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील 18 क्षेत्रांमधील निवडक सहभागींनी आज ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये संवादसत्र स्पर्धेसाठी एकच गर्दी केली होती. या गटचर्चेत सहभागींनी विशेषत: ग्रामीण भागातील युवकांनी समाज माध्यमांवर साधक बाधक चर्चा केली.

महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस ? समाज माध्यमे वरचढ की इलेक्ट्रॉनिक माध्यमे? समाज माध्यमांचा उपयोग शासनाने कसा करावा ? समाज माध्यमांवर प्रतिबंध हवेत? की नकोत? विधायक संदेशातून विवेकी समाज घडेल? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? अशा विषयांवर अनेक चांगले मुद्दे त्यांनी मांडल्याने या स्पर्धेचा स्तर वाढला.

ठाणे संवाद सत्रास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केंद्रातील अठराही कक्षांना भेट देऊन गटचर्चा पाहिली व सहभागींना प्रश्नही विचारले. शहापूर, मुरबाड भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचे खूप अप्रूप होते त्यामुळे कार्यक्रम संपल्यावरही त्यांच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी खूप गर्दी केली.

या गटचर्चाचे परीक्षण पत्रकार, साहित्यिक, कलाकार, शासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक अशा 36 जणांनी केले. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कुलचे संचालक केदार जोशी यांनी या उपक्रमासाठी संपूर्ण 18 खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या. मुख्य निरीक्षक म्हणून मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांनी काम पाहिले. सहभागींना भेट म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांच्या हस्ते ‘महामानव’ या ग्रंथाच्या प्रती देण्यात आल्या.

उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा कृषी अधिकारी एम डी सावंत, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, तसेच ठाण्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संवाद सत्रास भेट दिली आणि समाधान व्यक्त केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result