महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करा- दीपक केसरकर मंगळवार, ११ जून, २०१९


सिंधुदुर्गनगरी
: यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे विषयी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महामार्गा ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महामार्गाच्या कामामुळे व खनिज उत्खननामुळे बाधीत झालेल्या गावातील ग्रामस्थ, पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे झालेल्या गौण खनिजाच्या उत्खणनाचे सर्वेक्षण करावे अशा सूचना देऊन श्री.केसरकर म्हणाले की, नियमबाह्य उत्खणनावर कशाप्रकारे कारवाई करता येईल याविषयी जिल्हा खनिकर्म विभागाने प्रस्ताव सादर करावा. उत्खणनासाठीच्या परवानग्या आणि मर्यादा याची सविस्तर माहिती देण्यात यावी. खाणकाम करणाऱ्या कंपनीने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करावी, पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून तो पर्यावरण विभागामार्फत सादर करावा. महामार्गाचे काम सुरुळीत चालू राहावे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदाराने डायव्हर्शनचे बोर्ड योग्य प्रकारे लावून महामार्गावर अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महामार्गावर होणाऱ्या अपघातास ठेकेदारास जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गेल्यावर्षी पावसाळ्यात महामार्गासाठी टाकलेल्या भरावाची माती रस्त्यावर येऊन चिखल झाल्याने अनेक अपघात झाले व त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. यंदाच्या वर्षी असा एकही प्रकार होणार नाही. महामार्गावर माती येणार नाही याची ठेकेदाराने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी पालकमंत्री यांनी ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेलेल्या सोनुर्ले येथील बाधीत कुटुंबांचे म्हणणे जाणून घेतले व त्यानुसार संपूर्ण खाणकामाचा पुन्हा सर्वे करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

पाणी टंचाईचा सामना एकदिलाने करा

यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई कामांचा आढावा घेतला. यावेळी टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येऊन एक टीम म्हणून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी दिल्या. सर्वांनी एकत्रित रित्या काम केल्यास पाणी टंचाईचा सामना करणे सोपे जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत पाणी टंचाईची कामे झाली नाहीत ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने तत्काळ कामे सुरू करुन लोकांना दिलासा द्यावा. टंचाईच्या कामाकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य असून त्यात दिरंगाई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

खासदार श्री. राऊत यांनी जिल्ह्यात बोअरवेल पाडण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने एकही बोअरवेल पाडली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच बोअरवेलचे काम ताबडतोब सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. लोकांना पाण्याशिवाय ठेवता येणार नाही. त्यामुळे कामे लवकर होण्यासाठी जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर ठेकेदार नेमा, ग्रामपंचायतींकडे सोपवलेली कामे ताबडतोब पूर्ण करा, शक्यतो विंधन विहिरींचा प्रस्ताव ठेवा अशा सूचना खासदार श्री राऊत यांनी केल्या.

जिल्हा नियोजन समितीचा आढावा

श्री. केसरकर यांनी यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात आलेल्या विभागांनी तत्काळ प्रस्तावांना मंजुरी घेऊन काम सुरू करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्या विभागांना मागणी इतका निधी दिला आहे त्यांनी काम सुरू करावे, आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी नियोजन करावे. यंत्र, औषधे खरेदी यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावे. रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, अशा सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

चांदा ते बांदा योजनेच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या. सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करुन लाभार्थ्यांची अंतिम निवड करुन त्यांना पावसाळ्यापूर्वी प्रशिक्षण व लाभ द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result