महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जेएनपीटीच्या व्यापारवृद्धीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ-मुख्यमंत्री फडणवीस रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९
 शिवसमर्थ स्मारक अनावरण सोहळा

उरण जि. रायगड :
शासनाच्या दळणवळण सुविधा विकासाच्या धोरणांमुळे जेएनपीटी (जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट) हे आता देशातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य बंदर म्हणून नावारुपाला येत आहे. त्याचा फायदा जलवाहतूक व व्यापारवृद्धीला होत आहे. जेएनपीटीच्या या सातत्याने होत असलेल्या व्यापार वृद्धीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होण्याचा फायदा राज्याला होत असतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जासई ता. उरण येथे केले. जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांच्या 12.5 टक्के योजनेमध्ये  विकसित करण्यात आलेल्या शिवसमर्थ स्मारकाचे अनावरण आज धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते व  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

जेएनपीटीच्या सेझ साईट मैदानावर पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला केंद्रीय जहाजबांधणी
, रस्ते वाहतूक, महामार्ग जलवाहतूक, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, स्मारकाचे उद्घाटक अप्पासाहेब धर्माधिकारी, राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे, लोकसभा सदस्य खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, विधानसभा सदस्य मनोहर भोईर, भरतशेठ गोगावले, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष नीरज बन्सल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, विश्वस्त महेश बाल्दीविवेक देशपांडे, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अतुल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर शिल्पकार दीनकर धोपटे, इतिहासतज्ज्ञ व स्मारक संकल्पनाकार पांडुरंग बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दास्तान फाटा येथे प्रकल्पग्रस्तांच्या
12.5 टक्के योजनेमध्ये साकारण्यात आलेले शिवसमर्थ स्मारकाचे अनावरण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्मारक व तेथील प्रदर्शन, स्मारकांची पाहणी केली. या ठिकाणी स्मारकासहित बगिचा व एकूण 9000 वर्गमीटर एकूण जागेचा विकास करण्यात आला आहे.

त्यानंतर सभास्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जेएनपीटी मुंबई नॅव्हिगेशन चॅनेलच्या खोलीत वाढ करुन
12500 पेक्षा अधिक टीईयू क्षमतेच्या नवीन जहाज हाताळणीसाठी सज्ज झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तर जेएनपीटी सेझ येथे मुक्त व्यापार वेअरहाऊस क्षेत्र विकास कामाचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

भाषणाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुलवामा दुर्घटनेतील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.


श्री. फडणवीस म्हणाले
, शिवसमर्थ स्मारकामुळे भक्ती आणि शक्तीचे एकत्रिकरण झाले आहे. अस्मिता निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अध्यात्माची जोड होती म्हणून त्यांनी पराक्रम घडवला. शिवसमर्थ स्मारकात दैदिप्यमान इतिहासाची मांडणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतूक केले.आपल्या भाषणात नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव करुन श्री. फडणवीस म्हणाले की, जेएनपीटीच्या विकासामुळे व्यापारवृद्धी होत असून त्याचा फायदा हा राज्याच्या सकल उत्पादन वाढीतही होत आहे. याठिकाणी जगातील सर्वोत्तम कंपन्या काम करतायेत. बंदर आणि रस्त्यांचे मोठे जाळे उभारुन देशाचा वेगाने विकास होत आहे. भारतमाला व सागरमाला या दोन महत्त्वाकांक्षी योजनांची जबाबदारीही श्री. गडकरी यांच्यावर आहे. जेएनपीटीने खरेदी केलेली मुंबई येथील एयर इंडिया इमारत महाराष्ट्र शासन घेणार असून मुंबईतल्या मराठी माणसाचं वैभव म्हणून शासन या इमारतीचे जतन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी नानासाहेब धर्माधिकारी व अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या माणूस घडवण्याच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला उपस्थित अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांची अलोट गर्दी पाहून श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई हून येथे समुद्रमार्गे येताना तो सागर पाहिला आणि आता हा मानवी सागर पहावयास मिळाला. त्यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन दाद दिली.


जेएनपीटीच्या क्षमता विकासामुळे सव्वा लाख रोजगार निर्मिती -नितीन गडकरी
श्री. गडकरी म्हणाले कीशिवसमर्थ स्मारकाचे अनावरण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणे हा रायगड जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस आहे. दासबोधाच्या आधारे नानासाहेबांनी लोकशिक्षणाचे कार्य केले. माझ्या विभागामार्फत शिवसमर्थ स्मारकाचे काम झाले ही मला समाधान देणारी बाब आहे. ते म्हणाले की, सागरमाला योजनेंतर्गत 16 लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रात 114 प्रकल्प होत असून त्यांची गुंतवणूक 2 लाख 35 हजार कोटी इतकी आहे. यातून येत्या दोन वर्षात जेएनपीटीचा विकास होऊन  याठिकाणी एक ते सव्वा लाख तरुणांना काम मिळेल. याठिकाणी उपलब्ध होणारी रोजगाराची संधी सर्वप्रथम कोकणच्या भूमिपूत्राला दिली जाईल, असेही त्यांनी घोषित केले. कोकणचा विकास होण्यासाठी रोरो सेवा विकास, एअर बोट सुविधाठाणे ते विरार जलमार्ग असे विविध प्रकल्प कार्यान्वित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. गडकरी यांनी
, येत्या वर्षाच्या अखेरीपर्यंत तयार होऊ घातलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागली. त्या एका वृक्षाच्या बदल्यात 5 वृक्ष लागवड अशा पद्धतीने संपूर्ण महामार्ग हिरवा करण्यासाठी  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केले.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी
, मुंबई गोवा महामार्गावर वृक्षरोपण करण्यास योगदान देण्याचे मान्य केले व त्यासाठी शासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केले. यावेळी अनंत गिते
, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सचिनदादा धर्माधिकारी, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बाल्दी आदींनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी उपस्थित होते.

शिव- समर्थ स्मारक
1)शिव - समर्थ स्मारका मध्ये आरसीसी फ्रेम वर्क असलेली मुख्य इमारत, तिकीट खिडकी, ग्रीन रूम, ऍम्पिथिएटर, 7000 वर्गमीटर चे पाण्याचे कारंजे असलेला बगीचा व इलेक्ट्रिक सब- स्टेशन असून तळ मजल्यावर कॅफेटेरिया, परफॉर्मिंग आर्ट गॅलरी, माहितीकेंद्र, स्वागतकक्ष आणि ग्रीन रूम, पहिला मजला भित्तीचित्र व ऐतिहासिक पेंटींग आर्ट गॅलरी, दुसरा मजला मॉडेल व भित्तिचित्रांसाठी प्रदर्शन/ म्युझिअम तसेच ऑडिओ व्हिज्युअल रूम, तिसरा मजला लँडिंग स्लॅब, चौथा मजला पुतळा पाहता यावा यासाठी डेक स्लॅब, पाचवा मजला छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांचे शिल्प. संपूर्ण आराखडा पिरॅमिड शेपमध्ये असून दर्शनीय भागास काच व ॲस्ट्रोटर्फचे आवरण आहे. या आराखड्यात वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी 22 केव्हीएचा  ट्रान्सफॉर्मर, ओटीस कंपनीची लिफ्ट, सीसीटीव्ही  कॅमेरा, अग्नी रोधक सुविधा, स्मोक डिटेक्टर आणि मॅन्युअल कॉल पॉईंट इत्यादी सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत.

जेएनपीटी मुंबई नेव्हिगेशनल चॅनेल खोलीची वाढ
जेएनपीटी 14 मीटर असलेली समुद्री रुंदी व खोली 15 मीटरने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे 12500 टीएसयू इतकी क्षमता निर्माण होणार आहे.

जेएनपीटी सेझ मध्ये फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनचा विकास
1) जेएनपीटी सेझ  277.38 हेक्टर जमीनीपैकी सेझ साठी अधिसूचित  ई- निविदा व लिलाव च्या माध्यमातून युनिट/ फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनच्या विकासासाठी तसेच जेएनपीटी सेझच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ठराविक जागा निश्चित केली. ई- निविदा व ई- लिलावच्या माध्यमातून 16 गुंतवणूकदारांना (एसएमएमई साठी 15 भूखंड आणि फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन सुविधेसाठी 1 भूखंड) उत्पादननिर्मिती व फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनचा विकास करण्यासाठी एकूण 30.5 हेक्टर (75 एकर) भूखंड देण्यात आला आहे.

2) फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन खास आर्थिक क्षेत्र असून ज्यामध्ये व्यापार,वेअरहाऊसिंग तसेच निगडित गोष्टी हाताळल्या जाणार आहेत.  शुल्क व व्यापारासाठी भारतात असलेले हे विशेष असे विदेशी क्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे.


3) मेसर्स हिंदुस्तान इन्फ्रालॉग प्रायव्हेट लिमिटेड ही डीपी र्वल्ड इनव्हेस्टमेंट बीव्ही (डीपीडब्लू) तसेच नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर व  इनव्हेस्टमेंट फंड (एनआयआयएफ) यांची सयुंक्त कंपनी आहे. ही कंपनी जेएनपीटी सेझच्या 44 एकर भूखंडावर भाडेतत्वावर फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन विकसित करण्यासाठी निविदा-लिलाव प्रक्रियेत सहभागी झाली होती. या निविदा प्रक्रियेत  5 आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 566 कोटीची बोली लावणाऱ्या मेसर्स हिंदुस्तान इन्फ्रालॉग प्रायव्हेट लिमिटेडला काम देण्यात आले.


4) मेसर्स हिंदुस्तान इन्फ्रालॉग प्रायव्हेट लिमिटेडने बोली लावण्याच्यावेळी  सादर केलेल्या बिजनेस प्लान नुसार 17.97 हेक्टर जागेवर फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन विकसित करण्यासाठी साधारण 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जवळपास 600 हुन अधिक रोजगार (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) निर्मिती अपेक्षित आहे.


5) या प्रकल्पाचा विकास एका टप्प्यात व दोन वर्षात पूर्ण करणे प्रस्तावित आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result